पर्यटनावर पोट भरणाऱ्या दीनदुबळ्यांचा विचार करा; निसर्ग कवी ना.धों. महानोर यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:38 PM2020-11-21T13:38:24+5:302020-11-21T13:40:25+5:30
लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा
औरंगाबाद : पर्यटन स्थळांच्या परिसरात काम करून पर्यटनाद्वारे रोजीरोटी भागविणारे हजारो लोक अजिंठा-वेरूळ परिसरात आहेत. आठ महिन्यांपासून या लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या हजारो दीनदुबळ्यांचा विचार करून आणि कोरोनाच्या दृष्टीने संरक्षक अटी घालून पर्यटन स्थळे सुरू करावीत, अशी मागणी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. पर्यटन स्थळांवर अवलंबून असणारे हजारो व्यावसायिक आंदोलनाकडे वळतील, अशी वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये, असा इशाराही महानोर यांनी शुक्रवार, दि. २० रोजी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात महानोर म्हणाले की, भारताचे वैभव असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्याच्या परिसरात मी राहत असून, महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळांशी माझे दृढ नाते आहे. ही सर्व पर्यटन स्थळे मागील ८ महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटन स्थळांवर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांना आता कोणताही रोजगार राहिलेला नाही. हातावर पोट असल्याने अन्य कोणताही व्यवसाय या लोकांना ठाऊक नाही, तसेच या लोकांना कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. उपाशी, अर्धपाेटी जगून ही माणसे भरडली जात आहेत. हे अत्यंत अस्वस्थ करणारे वास्तव असून, याचा विचार करून पर्यटन स्थळे सुरू करावीत. अजिंठा गाईड असोसिएशन फॉर सोशल वेलफेअरचे अध्यक्ष शेख अबरार यांच्याकडे महानोर यांनी निवेदनाची प्रत सुपूर्त केली. या लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा, असेही महानोर यांनी म्हटले आहे.