तिसरी व चौथीचा बदलला अभ्यासक्रम
By Admin | Published: May 22, 2014 12:50 AM2014-05-22T00:50:31+5:302014-05-22T00:57:11+5:30
माधवी वाकोडकर , औरंगाबाद मुलांच्या पाठीवर आणि मनावर असलेले पाठ्यपुस्तकांचे ओझे हलके करायचे म्हणून वेगवेगळ्या विषयांची गुंफण कलात्मकदृष्ट्या एकाच विषयाच्या पुस्तकात केली आहे.
माधवी वाकोडकर , औरंगाबाद मुलांच्या पाठीवर आणि मनावर असलेले पाठ्यपुस्तकांचे ओझे हलके करायचे म्हणून वेगवेगळ्या विषयांची गुंफण कलात्मकदृष्ट्या एकाच विषयाच्या पुस्तकात केली आहे. बालभारतीच्या यंदाच्या तिसरी आणि चौथीच्या पाठ्यपुस्तकात हा प्रयोग पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मुलांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव घेता येणार आहे. सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार राज्याचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यंदाची तिसरी व चौथीची पुस्तके बाजारात येत आहेत. नव्या अभ्यासक्रमांबरोबरच अनेक बदल त्यात पाहायला मिळतील. हे बदल मुलांचे मन पुस्तकात कसे रमेल याला अनुसरून केले आहेत. मागील वर्षापर्यंत तिसरीला सहा विषय, तर चौथीला सात विषय होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ही संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे तिसरीला चार विषयांची पुस्तके, तर चौथीला पाच विषयांची पुस्तके असणार आहेत. तिसरी व चौथीला मराठी, इंग्रजी, गणित हे विषय अनिवार्य असतील; पण तिसरीला पूर्वी विज्ञान, इतिहास, भूगोलाची स्वतंत्र पुस्तके होती. ती आता नसतील. या तिन्ही पुस्तकांचे एकत्रित पुस्तक ‘परिसर अभ्यास’ या नावाने विद्यार्थ्यांसमोर येईल. चौथीला विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांची पूर्वी स्वतंत्र चार पुस्तके होती. याऐवजी यंदा परिसर अभ्यास भाग-१ व भाग-२ अशी दोन वेगवेगळी पुस्तके प्रसिद्ध होतील. भाग-१मध्ये विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय, तर भाग-२ मध्ये इतिहास विषय अभ्यासायला मिळेल.तिसरी आणि चौथीची नव्या अभ्यासक्रमांची काही पुस्तके बाजारात आली आहेत. त्यापैकी बालभारती चौथी आणि परिसर अभ्यास भाग-१ या पुस्तकांची छपाई चालू आहे. इंग्रजी माध्यमाची पुस्तके जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उपलब्ध होतील. उर्वरित पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. छपाई चालू असलेली पुस्तके मे महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होतील. ती जास्तीत जास्त निर्दोष आणि दर्जेदार व्हावीत, या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आहेत, असे चंद्रमणी बोरकर यांनी सांगितले. चौथीला विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय आहेत. मात्र, त्यांची स्वतंत्र पुस्तके नसतील. या विषयाचा समावेश ‘परिसर अभ्यासक्रम’ या विषयांमध्ये करण्यात आला आहे. तो करताना विषयाचे कप्पे केलेले नाहीत. असे आहेत विषयातील बदलपूर्वी तिसरीचे विषय - इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, मराठी आणि इंग्रजी (६ विषय) नवीन तिसरीचे विषय - मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल)पूर्वी चौथीचे विषय - इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, मराठी आणि इंग्रजी.नवीन चौथीचे विषय - मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास-१, परिसर अभ्यास-२ (जिल्हा- भूगोल)एकमेकांचे धागे जोडलेले आहेत. त्यामुळे आपण जे शिकत आहोत, ते नेमके काय आहे, हे विद्यार्थ्यांना आपोआप समजेल. एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांकडे, प्रश्नांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी विकसित होईल. सांगा पाहू, करून पाहा, जरा डोके चालवा, या शीर्षकाखाली कृतीही दिली आहे. त्यामुळे मुलांचे मन अभ्यासात रमायला नक्कीच मदत हाईल. - चंद्रमणी बोरकर, संचालक, पाठ्यपुस्तक मंडळ पुणे.