तलावावर तिसरा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:19 AM2017-09-03T00:19:16+5:302017-09-03T00:19:16+5:30
सातारा श्री विसर्जन विहिरीचा परिसर पोलीस व सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देवळाई व बाळापूर शिवारातील धोकादायक तलावात गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी गणेशभक्तांनी खोल पाण्यात जाऊ नये, पाण्यात उड्या मारू नयेत आदी खबरदारीचे फलक स्वत: चिकलठाणा पोलीस लावणार आहेत, तर सातारा श्री विसर्जन विहिरीचा परिसर पोलीस व सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे.
या तलावात पोहण्याच्या मोहात अनेकांनी जीव गमावला असल्याने धोकादायक तलावात पोहण्यास बंदीचे फलक लावण्याच्या सूचना बाळापूर ग्रामपंचायतीला दिल्या होत्या; परंतु त्याकडे कानाडोळा केला. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी नागरिकांच्या सहकार्याने पाच ते सहा ग्लोसाईन व लोखंडी फलक बनवले. ते श्री विसर्जनापूर्वी तलाव क्षेत्राच्या परिसरात लावण्यात येणार आहेत.
हा तलाव पोहण्यासाठी असुरक्षित असल्याने त्या ठिकाणी स्वत:हून कोणीही आपला जीव धोक्यात घालू नये. श्री विसर्जनानंतरही त्या तलाव परिसरात फिरताना पोलिसांच्या गस्ती पथकाला कोणी आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे.
शहरातील बहुतांश गणेश मंडळे
गतवर्षी सातारा विसर्जन विहिरीवर शहरातील विविध विभागांतील गणेश मंडळांनी विसर्जन केले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून यंदा मनपा व सातारा पोलिसांनी अधिक दक्षता घेण्याचे ठरविले आहे.
निर्माल्य तलावात टाकू नये
शक्यतोवर गणेशभक्तांनी विसर्जन विहिरीचाच उपयोग करावा. तलावात विसर्जन करताना अति दक्षता बाळगणे गरजेचे आहे. निर्माल्य तलावात टाकू नका, पर्यावरण प्रदूषण राखावे, अशाही सूचना चिकलठाणा पोलीस ठाण्याने दिल्या आहेत.