सिद्धार्थ उद्यानातील तिसरा डोळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 07:15 PM2019-02-28T19:15:05+5:302019-02-28T19:15:16+5:30
देशभरात सध्या सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य दिले जात असताना महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
औरंगाबाद : देशभरात सध्या सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य दिले जात असताना महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. देखभाल-दुरुस्तीसाठी केवळ ५० हजारांचा खर्च आहे; परंतु त्यास मंजुरी मिळत नसल्याने ‘सीसीटीव्ही’ची दुरुस्ती होत नाही.
सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे नेहमीच पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मनपाने उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचा आढावा घेतला. त्यावेळी ही माहिती समोर आली. उद्यानातील सीसीटीव्ही सुरू आहेत का, अशी विचारणा महापौरांनी अधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, समोरच्या भागातील तेवढे सुरू आहेत. मात्र, आतील सीसीटीव्ही बंद आहेत. दुरुस्तीसाठी ४९ हजार रुपयांची संचिका तयार करून ती प्रशासनाकडे सादर केली; परंतु त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती ऐकून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. देशभराबरोबर शहरातही अलर्ट आहे. कडेकोट सुरक्षेवर भर दिला जात असताना मनपा प्रशासन सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
३.५० कोटींचे उत्पन्न
मनपाला सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातून वर्षाकाठी ३.५० कोटींचे उत्पन्न मिळते. त्यातुलनेत प्राणिसंग्रहालयातील कामांवर केवळ २० लाखांचा खर्च झाल्याची माहिती महापौरांच्या बैठकीत समोर आली, तरीही निधीसाठी प्रशासनाकडे हात पसविण्याची वेळ येत आहे. त्यामुळे एप्रिलपासून उद्यानाचे स्वतंत्र खाते उघडण्याची सूचना महापौरांनी केली.