तिसऱ्या लाटेत जीवित हानी कमी होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:02 AM2021-07-24T04:02:11+5:302021-07-24T04:02:11+5:30
मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी जीवित हानी निश्चितच कमी होणार आहे. महापालिका प्रशासनाकडून ऑक्सिजन, ...
मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी जीवित हानी निश्चितच कमी होणार आहे. महापालिका प्रशासनाकडून ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आदी तयारी करून ठेवण्यात आली आहे, असे मत प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले.
दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत होता. नागरिकांना लसही मिळालेली नव्हती. ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला. तिसरी लाट आली तरी दुसऱ्या लाटेप्रमाणे फारशी धावपळ होणार नाही. मानसिकरीत्या आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. शहराला दररोज ४५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. ६७ मेट्रिक टन ऑक्सिजनची क्षमता तयार करून ठेवण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत बाधित रुग्ण वाढतील. दररोज २५० ते ३०० जण बाधित आढळून येऊ शकतात. अनेकांनी पहिली किंवा दुसरी लस घेतलेली आहे. या कारणामुळे संसर्ग झाल्यानंतरही रुग्ण थेट मृत्यूच्या दाढेत जाणार नाहीत. लवकरात लवकर बरे होऊन घरी जाऊ शकतील. लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होईल, असेही एक भाकीत आहे. त्यादृष्टीने गरवारे कंपनीच्या सहकार्याने बाल कोविड सेंटर उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे ऑक्सिजनसह किमान ३५० बेड उपलब्ध होतील. त्यामुळे तिसरी लाट म्हणून अधिक घाबरण्याचे अजिबात कारण नाही. मात्र, शासनाने ठरवून दिलेले नियम आणखी काही दिवस तरी पाळावेच लागतील.
शहर आणीबाणीच्या स्थितीत
आज शहरात रुग्णसंख्या अटोक्यात आहे. असे असले तरी शहर पूर्णपणे सुरक्षित आहे, असे म्हणता येणार नाही. सध्या शहर आणीबाणीच्या स्थितीतून जात आहे. संकट कधी ओढवेल याचा नेम नाही. नागरिकांनी किमान पहिला डोस तरी घेऊन ठेवावा. संसर्ग झाला तरी जीव वाचेल, असेही पाण्डेय ायांनी नमूद केले.