तहानलेल्या बिबट्याचा शेतातील रसायनयुक्त पाणी पिल्याने तडफडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 02:06 PM2018-11-19T14:06:08+5:302018-11-19T14:07:10+5:30
तालुक्यातील पिंपरी शिवारात आज सकाळी नंबर 61 मध्ये एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला.
खुलताबाद (औरंगाबाद ) : तालुक्यातील पिंपरी शिवारात आज सकाळी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वनविभाग व ग्रामस्थांनी बिबट्यावर अंत्यसंस्कार केले असून रसायन युक्त पाणी पिल्याने बिबट्याचा अंत झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी शिवारात अंकुश राजाराम अधाने यांची गट नंबर 61 मध्ये शेती आहे. आज सकाळी अधाने यांना त्यांच्या मका पिकाच्या शेतात एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. अधाने यांनी याची माहिती चिंचोली येथील उपसरपंच रामहरी बोडखे, संजय राजपूत ,साईनाथ बोडखे यांना दिली असता त्यांनी वनविभागाला माहिती देत घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वनक्षेत्रपाल यशपाल दिलपाक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली व ग्रामस्थांच्या सहाय्याने बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.
पाण्याच्या शोधात आला होता बिबट्या
या शिवारात नेहमी बिबट्याचा वावर असून बाजुला वनविभागाचे सुमारे पाचशे एकराचे डोंगर व वनजमीन आहे.मात्र येथे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही. यामुळे पाण्याच्या शोधात हे प्राणी अनेकदा मानवी वस्ती कडे धाव घेतात.
रसायनयुक पाण्याने झाला अंत
या शिवारात शेतकरी सध्या पिकाला रोग नियंत्रकाची मात्रा पाण्याद्वारे देत आहेत. यासाठी रसायन बकेटमध्ये पाण्यात मिसळून ते ठिबक द्वारे पिकांनी दिले जाते. येथील शेतकऱ्याने याच पद्धतीने बकेटीतील पाण्यात रसायन मिसळून ते ठिबक द्वारे दिले. मात्र उरलेले रसायनयुक्त पाणी बकेटमध्येच होते. याच दरम्यान तहानलेला बिबट्या पाण्याच्या शोधात शेतात आला व त्याने हे रसायनयुक्त पाणी पिले. बकेटमधील पाण्यात रसायनाची अत्यंत जहाल मात्रा असल्याने बिबट्याचा तिथेच तडफडून मृत्यू झाला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल यशपाल दिलपाक यांनी दिली आहे.