दुष्काळात तेरावा महिना!

By Admin | Published: April 23, 2016 11:34 PM2016-04-23T23:34:52+5:302016-04-23T23:49:38+5:30

जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

Thirteen months in the famine! | दुष्काळात तेरावा महिना!

दुष्काळात तेरावा महिना!

googlenewsNext


जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ऐन दुष्काळात जलवाहिनी फुटल्याने जालनेकरांना दुष्काळात तेरावा महिना सहन करावा लागणार आहे. जलवाहिनी फुटल्याने चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे.
घाणेवाडी जलाशय आटल्याने शहरातील नवीन जालना भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जायकवाडी जलवाहिनीचा दुरूस्तीचा प्रश्नही गाजत आहे. अशा परिस्थतीत एका दूरध्वनी सेवा देणाऱ्या कंपनीचे केबल अंथरण्याचे काम सुरू असताना पोकलॅनचा धक्का लागून जलवाहिनीचा पाईप निखळून गळती सुरू झाली. काही वेळातच परिसर जलमय झाला. दूरपर्यंत पाणी वाहून गेले. काही महिलांनी पाणी भरून घेतले. व्हॉल्व्ह बंद करेपर्यंत लाखो लिटर पाणी वाहून गेले. या पाण्यामुळे परिसरातील दोन विहिरीही तुडुंब भरल्या होत्या.
जायकवाडी ते जालना जलवाहिनी दुरूस्तीच्या मुद्यावरून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. संबंधित एजन्सी दुरूस्ती करण्यासाठी किती दिवस लावणार, पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासोबतच या जलवाहिनीस इतर ठिकाणीही गळती लागली आहे. व्हॉल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पालिका प्रत्येक व्हॉल्व्हर लोखंडी जाळ्या बसविणार होती. चार महिने उलटल्यानंतरही पालिकेने या जाळ्या बसविलेल्या नाहीत. परिणामी व्हॉल्व्हमधून गळतीसोबतच चोरीही वाढली आहे.
मुख्याधिकादी दीपक पुजारी हे वैद्यकीय रजेवर आहेत. कर्मचारी संपामुळे सर्व विभाग बंद आहेत. त्यामुळे पालिकेत अधिकारी व कर्मचारी नसल्याने पालिका वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. त्यातच जलवाहिनी फुटल्याने शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाणेवाडी जलाशय कोरडा पडल्याने नवीन जालना भागातील बहुतांश नागरिकांना जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. त्यातच आता जलवाहिनी फुटल्याने समस्या गंभीर बनत आहे.
शहरात ठिकठिकाणी अंतर्गत जलवाहिनीला गळती लागली असली तरी पालिकेकडून कानाडोळा होत आहे. दुरूस्तीच्या नावाखाली थातूरमातूर डागडुजी करून बिल उचलण्याचा सर्रास प्रकार पालिकेत सुरू असल्याचे चित्र आहे.
इंदेवाडीसोबतच गोलापांगरी, शेवगा, हारतखेडा, मठपिंपळगाव पाटी, जामखेड पाटी, पाचोड रस्त्या, अंबड रस्ता आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलवाहिनीला गळती लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नगर पालिकेने जलवाहिनी दुरूस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवावी, अशी मागणीही नागरिकांतून जोर धरत आहे. पालिकेचा पाणीपुरवठा विभाग असून अडचण नसून खोळंबा असा बनला आहे. (प्रतिनिधी)
जायकवाडी ते जालना जलवाहिनी फुटल्याने शहरवासियांना चार दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिनी दुरूस्ती मंगळवारपर्यंत पूर्ण होईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. कडक उन्हामुळे कूपनलिका आटल्या आहेत. त्यातच चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
जलवाहिनी दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेतले आहे. तरीही तीन ते चार दिवस पाणीपुरवठा बंद राहील, असे पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे यांनी सांगितले.

Web Title: Thirteen months in the famine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.