आंदोलकांकडून तेराव्याचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:49 AM2018-03-01T00:49:06+5:302018-03-01T00:49:45+5:30
नारेगाव कचरा डेपोचा १६ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. २५ रोजी दहाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी या भागातील आंदोलक शेतक-यांनी चक्क तेराव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. गोड जेवणही यावेळी देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नारेगाव कचरा डेपोचा १६ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. २५ रोजी दहाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी या भागातील आंदोलक शेतक-यांनी चक्क तेराव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. गोड जेवणही यावेळी देण्यात आले.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने दहावा, तेरावा असे विधी केले जातात त्याच पद्धतीने नारेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बुधवारी कचरा डेपोचा तेरावा केला. कचरा डेपो हटविण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील पंधरा गावांतील नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले आहे. १४ दिवसांमध्ये मनपाची एकही गाडी कचरा डेपोकडे फिरकली नाही. आंदोलक शेतकरी दररोज वेगवेगळे कार्यक्रम याठिकाणी घेत आहेत. २५ फेब्रुवारी रोजी कचरा डेपोच्या दहाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यानंतर एक निमंत्रणपत्रिका छापून बुधवारी तेराव्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कचरा डेपोजवळ सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी दहा वाजता हभप विनोदाचार्य साठे महाराज यांचे कीर्तन झाले. दुपारी एक वाचता कीर्तन संपल्यानंतर तेराव्याचा विधी करण्यात आला. गाईला घास दिल्यानंतर गोड जेवणाच्या पंक्ती बसल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गेल्या तेरा दिवसांपासून आंदोलनाचा किल्ला लढविणाºया परिसरातील ग्रामस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्वांच्या एकीमुळेच शासन हादरले, पालकमंत्री, विधानसभा अध्यक्षांना येथे यावे लागले. कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागत आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. पुंडलिकअप्पा अंभोरे, डॉ. विजय डख, मनोज गायके, विष्णू भेसर, साईनाथ चोथे, नाना पळसकर, संजय हरणे, भाऊसाहेब गायके, विष्णू जाधव, डॉ. दिलावर बेग यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
महिला, विद्यार्थी उपस्थित
नारेगाव कचरा डेपोविरोधात पुरुषांप्रमाणेच पंचक्रोशीतील महिलांच्या भावनाही तीव्र आहेत. विद्यार्थ्यांचाही आंदोलनात सहभाग आहे. हे सर्वजण आजच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.