तेरा वर्षांपूर्वीचा वाद समन्वयातून मिटवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:06 AM2021-02-05T04:06:11+5:302021-02-05T04:06:11+5:30
केळगाव : ग्रामीण भागात सर्वाधिक वाद शेतीच्या कारणावरून होत असल्याचे चित्र आहे. असाच काहीसा वाद केळगावातील इंगळे कुटुंबीयात वारंवार ...
केळगाव : ग्रामीण भागात सर्वाधिक वाद शेतीच्या कारणावरून होत असल्याचे चित्र आहे. असाच काहीसा वाद केळगावातील इंगळे कुटुंबीयात वारंवार होत असल्याने दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या; मात्र यात आमठाणा पोलिसांनी समन्वयातून हा वाद निकाली काढण्यात यश मिळवले. १३ वर्षांपूर्वीचा वाद संपुष्ठात आला.
सिल्लोड तालुक्यातील केळगावात सुनील पुंडलिक इंगळे, हर्षल पुंडलिक इंगळे तसेच दीपक पुंडलिक इंगळे, अनिल पुंडलीक इंगळे (सावत्र भाऊ-भाऊ) यांच्यात गेल्या १३ वर्षांपासून शेतीचा वाद सुरू होता. यामुळे दोन्ही गटात कायम भांडणे होत असल्याचे समोर येत हाेते. गेल्या २० दिवसांपूर्वी संबंधितांमध्ये पुन्हा वाद झाल्याने तो आमठाना पोलीस चौकीपर्यंत गेला. दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे, बीट जमादार रंगराव बावस्कर, पोलीस नाईक मगेश आरके, बाळासाहेब इवरे आदींच्या सहकार्याने तक्रारदारांची समजूत काढत त्यांच्यातील वाद मिटवला. विशेष म्हणजे गावातील नागरिक आणि पोलिसांच्या उपस्थितीत एकमेकांच्या सहमतीने संबंधितांनी शेतीची वाटणी करून घेतली. या सकारात्मक निर्णयामुळे तब्बल १३ वर्षांनंतर इंगळे कुटुंबीयांतील वादास पूर्णविराम मिळाला.
............प्रतिक्रिया ................ ग्रामीण भागात शेतीसह किरकोळ घटनेमुळे वाद विकोपाला जातात. वाद कमी करण्याच्या उद्देशाने ‘आम्ही पोलीस आपल्या बांधावर’ या संकल्पनेतून केळगावातील वाद संपुष्टात आणत दोन्ही गटांना समोरासमोर बोलावून मार्गदर्शन केले. त्यामुळे संबंधित वाद मिटल्याने त्यांचा पुढील होणारा त्रास कमी झाला.
- किरण बिडवे,
सहायक पोलीस निरीक्षक,
ग्रामीण पोलीस ठाणे सिल्लोड.