दुष्काळात तेरावा महिना, आधी ३० तासांचा शटडाऊन आता जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:11 IST2025-03-25T13:10:28+5:302025-03-25T13:11:03+5:30
छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्ने काही केल्या संपायला तयार नाहीत.

दुष्काळात तेरावा महिना, आधी ३० तासांचा शटडाऊन आता जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने पाणीपुरवठ्यात ३० तासांचा शटडाऊन घेतल्यानंतर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतानाच सोमवारी रात्री ८:३० वाजता फारोळा फाटा येथे १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हला ट्रकने धडक दिली. त्यामुळे व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. रात्री उशिरा मनपा अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले.
शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्ने काही केल्या संपायला तयार नाहीत. दररोज नवीन एक समस्या निर्माण होत आहे. २० मार्च रोजी मनपाने ३० तासांचा शटडाऊन घेतला होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा अगोदरच दोन दिवस पुढे ढकलला गेला. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असताना दोन दिवसांपूर्वी नवीन ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे पाइप निखळल्यामुळे दररोज २० एमएलडी पाणी शहरात कमी येत आहे. त्यात भरीस भर म्हणून सोमवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास फारोळा फाटा येथे सिमेंटने भरलेल्या ट्रकने १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हला धडक दिली. त्यानंतर व्हॉल्व्हमधून पाण्याचे फवारे उंच उडत होते. लाखो लिटर पाणी वाहून जात होते. घटनेची माहिती मिळताच उपअभियंता किरण धांडे, बाविस्कर यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम सुरू झाले.