थर्टी फर्स्ट महागात, ४४ मद्यपी वाहनचालक रंगेहाथ सापडले; ३२३ वाहनचालकांना तीन लाखांचा दंड
By सुमित डोळे | Updated: January 1, 2024 19:34 IST2024-01-01T19:31:01+5:302024-01-01T19:34:24+5:30
एकूण ४६० वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली.

थर्टी फर्स्ट महागात, ४४ मद्यपी वाहनचालक रंगेहाथ सापडले; ३२३ वाहनचालकांना तीन लाखांचा दंड
छत्रपती संभाजीनगर : नव्या वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ४४ तर कर्कश्श आवाज करत बेदरकारपणे वाहन पळविणाऱ्या ३२३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यात मद्यपी वाहनचालकांची वाहने जप्त करून न्यायालयात हजर राहण्याची नोटीस दिल्याचे उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी सांगितले.
शहरात रविवारी सायंकाळपासूनच नववर्षाच्या स्वागताचा जोश वाढला होता. मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत झाले. यावेळी शहरातील सर्व रेस्टारंट्स, बार ग्राहकांच्या उत्साहाने भरले होते. शहर पोलिसांनी यंदा १ वाजेपर्यंतच वेळ निर्धारित केली होती. त्यामुळे १ वाजण्याच्या सुमारास सर्वत्र हॉटेल बंद होण्यास सुरूवात झाली होती. जवळपास सायंकाळी ६ ते १:३० यादरम्यान क्रांती चौक, बाबा चौक, रेल्वे स्थानक, शहानुरमिया दर्गा, सिडको चौक, हर्सुल टी पॉईंट येथे वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित वाहनचालकांची तपासणी केली. यात नांदेडकर यांच्यासह सहायक आयुक्त अशोक थोरात, निरीक्षक अमोल देवकर, राजेश मयेकर, राजश्री आडे, सचिन इंगोले, सचिन मिरधे आदींच्या पथकांचा समावेश होता.
नांदेडकर यांनी सांगितले की, एकूण ४६० वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली. यात मद्यप्राशन केल्याचे सिद्ध झालेल्या ४४ वाहनचालकांना न्यायालयात उपस्थित राहण्याची नोटीस देऊन वाहन जप्त करण्यात आले. तर ३२३ जणांना २ लाख ८६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.