पिशोर येथे मानमोडी रोगाने तीस कोंबड्या दगावल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:04 AM2021-01-14T04:04:56+5:302021-01-14T04:04:56+5:30
पिशोर : येथील काही घरांतील पाळीव कोंबड्या मानमोडी नावाच्या आजारामुळे मृत्युमुखी पडल्याची घटना शहानगर भागात उघडकीस आली. बर्ड फ्लूचा ...
पिशोर : येथील काही घरांतील पाळीव कोंबड्या मानमोडी नावाच्या आजारामुळे मृत्युमुखी पडल्याची घटना शहानगर भागात उघडकीस आली. बर्ड फ्लूचा कहर सुरू असतानाच अचानक या कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने परिसरातील कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की, येथील शहानगर भागात अनेक घरांत कोंबड्या पाळल्या जातात. यातील शेजारी असलेल्या दोन घरांपैकी एका घरातील जवळपास वीस कोंबड्या आणि दुसऱ्या घरातील दहा कोंबड्या, अशा एकूण तीस कोंबड्या गळ्याजवळ सूज येऊन व श्वास गुदमरल्याने अचानक दगावल्या. या परिसरात अद्याप अनेक कोंबड्या ग्लानी आलेल्या अवस्थेत आहेत. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चोले यांच्याशी संपर्क साधून या प्रकारविषयी त्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन आजारी व मृत पावलेल्या कोंबड्यांची तपासणी केली. हा बर्ड फ्लूचा प्रकार नसून मानमोडी नावाच्या रोगाने या कोंबड्या मृत झाल्याचे त्यांनी सांगितले. आजारी कोंबड्यांवर औषधोपचार करण्यात आला आहे. परिसरात असा काही प्रकार आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी चोले यांनी केले आहे.