नाल्याच्या पुरात दुचाकी घसरून तीस जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:04 AM2021-09-19T04:04:12+5:302021-09-19T04:04:12+5:30
घोसला : सोयगाव-बनोटी रस्त्यावरील घोसला येथील नाल्याच्या फरशीवरून सुमारे बावीस दुचाकी घसरून पडल्याने सुमारे ३० जण जखमी झाले ...
घोसला : सोयगाव-बनोटी रस्त्यावरील घोसला येथील नाल्याच्या फरशीवरून सुमारे बावीस दुचाकी घसरून पडल्याने सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दिवसभर या रस्त्यावर सुरू होती. यात तीन गंभीर जखमींना पाचोरा येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
सोयगाव-बनोटी रस्त्यावर घोसला गावाजवळ खटकाळी नाला आहे. या नाल्यावरील पुलाच्या फरशीवर सततच्या पावसाने शेवाळ जमा झालेले आहे. पाण्याचा आणि शेवाळाचा अंदाज न आल्याने शनिवारी दिवसभरात २२ दुचाकी घसरून पडल्या. यात सुमारे तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून या पुलाच्या फरशीची उंची वाढविण्याबाबत कोणत्याही उपाययोजना हाती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
----
पुलाला संरक्षण कठडे नाहीत
शेवाळावरून घसरलेल्या दुचाकी धारकांना मोठा धोका निर्माण झालेला आहे. घसरलेल्या दुचाकीधारकाचा तोल न सांभाळला गेल्यास थेट पाण्याच्या प्रवाहात वाहण्याचा धोका निर्माण झालेला आहे. शुक्रवारी रात्री घोसला परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे या नाल्याचा पूर वाढलेला होता. त्यातच दुचाकीधारक शेवाळावरून घसरल्याने दुपारनंतर सोयगाव-बनोटी वाहतूक बंद करण्यात आली होती.
ग्रामस्थांचा मदतीचा हात
पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गावातील काही ग्रामस्थांनी दुपारनंतर मदत केंद्र सुरू करून नवख्या दुचाकी धारकांना गाईडलाईन केले. पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात दिला. यावेळी प्रमोद वाघ, सुधाकर युवरे, समाधान घुले, हेमंत गव्हांडे, राहुल गवळी, राहुल बोरसे, अमोल बोरसे, आबा उगले, निवृत्ती गव्हांडे, निवृत्ती सागरे आदींनी मदत केली. तर पोलिसांनी मात्र, मदतीसाठी धाव घेतली नव्हती.
180921\img-20210918-wa0090.jpg~180921\img-20210918-wa0066.jpg
घोसला-घोसला ता सोयगाव येथील नाल्याच्या पूर व दुसऱ्या छायाचित्रात दुचाकी घसरल्याने गोंधळ
छायाचित्र ओळी-ज्ञानेश्वर वाघ घोसला~घोसला-अपघातानंतर पायी प्रवास करतांना प्रवाशी