तीसगाव-छावणी रस्ता बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 09:20 PM2019-06-04T21:20:50+5:302019-06-04T21:21:05+5:30
तीसगाव ते छावणी उड्डाणपूल रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे.
वाळूज महानगर : तीसगाव ते छावणी उड्डाणपूल रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता उखडल्याने रस्त्यावर खडी पसरली असून, जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. खडी व खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याने हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे.
औरंगाबाद-नगर महामार्गावरील छावणी उड्डाण पूल ते तीसगाव जाणाऱ्या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. जवळपास दोन ते अडीच किलोमीटर असलेला हा रस्ता उखडला गेला असल्याने रस्त्यावर खडी पसरली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत.
तीसगावसह परिसरातील सिडको, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर, साजापूर, करोडी आदी भागातील नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारही या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गावरुन ये-जा करणाºया वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जवळचा मार्ग असूनही रस्ता धोकादायक बनल्याने तीसगावसह परिसरातील नागरिकांना तीन ते चार किलोमीटरचा वळसा घालून एएस क्लब चौकातून औरंगाबाद-नगर महामार्गाने ये-जा करावी लागत आहे.
रस्ते विकासात अडथळा
स्थानिक ग्रामपंचायतीने दोन वेळा रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. कामासाठी खडीही टाकण्यात आली. मात्र, सदरील रस्ता छावणी हद्दीत येत असल्याने छावणी प्रशासनाने कामासाठी टाकलेली खडी उचलायला लावली.
तसेच आमदार निधीतूनही हा रस्ता मंजूर करण्यात आला. पण पुन्हा छावणी प्रशासनाचे रस्ता विकास कामाला विरोध केला. गेल्या काही वर्षापासून आजतागायत रस्याचे काम तसेच रखडले आहे.
ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा सुरुच
गावातील नागरिक १९७२ पासून या रस्त्याने ये-जा करतात. परंतू छावणी प्रशासन हा रस्ता नसल्याचे सांगत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी छावणी प्रशासनाची भेटही घेतली. सदरील रस्त्याचा प्रस्ताव पुणे येथील छावणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवितो, असे छावणी प्रशासनाने सांगितले. या रस्त्याच्या विकासासाठी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा केला जात असल्याचे सरपंच कौशल्याबाई रामचंद्र कसुरे यांनी सांगितले.