तीसगावात कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:23 PM2019-04-11T23:23:43+5:302019-04-11T23:23:53+5:30
लक्ष्मीमाता यात्रेनिमित्त तीसगाव येथे गुरुवारी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्हाभरातून दोनशेपेक्षा अधिक मल्लांनी सहभाग घेतला.
वाळूज महानगर : लक्ष्मीमाता यात्रेनिमित्त तीसगाव येथे गुरुवारी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्हाभरातून दोनशेपेक्षा अधिक मल्लांनी सहभाग घेतला. सहभागी मल्लांनी आपल्या एकापेक्षा एक सरस डावाने विरोधी मल्लाला धोबी पछाड देत स्पर्धेत रंगत आणली. नायगावचा मल्ल मोईन शेख स्पर्धेचा विजेता ठरला
तीसगाव येथे लक्ष्मीमाता यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्ती स्पर्धा घेतली जाते. या वर्षीही तीसगाव चौफुलीलगत गुरुवारी सायंकाळी कुस्तीच्या दंगलीचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ मल्ल दिगंबर कसुरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी जि.प. सदस्य रामचंद्र कसुरे, माजी सरपंच अंजन साळवे, संजय जाधव, राजु कनिसे, विठ्ठल चोपडे, कमलसिंग सूर्यवंशी, पर्वत कसुरे, रामा तरैय्यावाले, पाशु शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत तीसगावसह जटवाडा, हर्सूल, आसेगाव, बेगमपुरा, नायगाव, सावंगी, पैठण, टाकळी, वरझडी, देवळाई आदी भागातून २०० पेक्षा अधिक मल्लांनी सहभाग घेतला. १०० रुपयापासून ते ३००० रुपयांपर्यंत बोली लावून कुस्ती खेळविण्यात आल्या.
नायगावचा मोईन शेख व देवळाईचा जुबेर शेख यांच्यात ३ हजार रुपयांची शेवटची कुस्ती झाली. यात मोईन शेख याने विजेते पद पटकावले. पंच म्हणून कडुबा चोपडे, जगदिश शेलार, रायभान शेलार, रमेश शेलार, रामचंद्र सूर्यवंशी, भागिनाथ शेलार, संजय जाधव यांनी काम पाहिले. कुस्त्याची दंगल पहाण्यासाठी तीसगावस परिसरातील वडगाव कोल्हाटी, साजारपूर, करोडी, सिडको, बजाजनगर, पंढरपूर आदी भागातील कुस्ती प्रेमींनी गर्दी केली होती.