"हे सरकार थाटामाटात मरणार; जवान शहिद होत असतांना हे स्वत:वर फुलं उधळून घेतात"
By विकास राऊत | Published: September 15, 2023 12:49 PM2023-09-15T12:49:12+5:302023-09-15T12:49:28+5:30
चाकूरकरांनी कोट बदलला तर राजीनामा दिला; आता यांनी काय केले पाहिजे ?
छत्रपती संभाजीनगर : विद्यमान केंद्र व राज्यातील सरकार थाटामाटातच मरणार आहे. आणि ती वेळ आम्ही आणणार आहोत. जवान शहिद होत असतांना पंतप्रधान, गृहमंत्री स्वत:वर फुलं उधळून घेतात. यांची माणसुकी कुठे गेली आहे, असा सवाल ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलतांना केला.
बेकायदेशीर राज्य सरकार मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसणार असून ते करीत असलेल्या उधळपट्टीचा त्यांना हिशेब द्यावा लागेल. असेही ते म्हणाले. विभागात दुष्काळ परिस्थिती आहे, अनेक प्रश्न आहेत. शनिवारच्या बैठकीतील पोपटपंचीकडे आमचे लक्ष राहणार आहे.
अमित शहा दिल्ली भेटत नाहीत
गृहमंत्री अमीत शहा यांचा दौरा रद्द झाल्यामुळे भ्रमनिरास झाला आहे. ते दिल्लीत भेटत नाहीत, म्हणून इकडे भेटायला आलो होतो. मराठवाड्याचा अमृतकाळ कागदावर असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजू राठोड आदींची उपस्थिती होती.
चाकूरकरांनी कोट बदलला तर राजीनामा दिला.....
लष्कराचे अधिकारी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले असताना पंतप्रधान स्वतः च्या कार्यालयात स्वतः वर फुलं उधळत होते. माजी गृहमंत्री चाकूरकर यांनी कोट बदलला तर त्यांना राजीनामा द्यावा लागला, आणि इकडे पंतप्रधान आणि भाजप उत्साहात जल्लोष साजरा करतात. यांनी काय केले पाहिजे, असा सवाल खा.राऊत यांनी केला.