ही व्होट बँकेसाठी ‘नौटंकी’; केंद्रीय मंत्री भागवत कराडांची खासदार जलील यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:59 PM2023-03-13T12:59:48+5:302023-03-13T13:01:00+5:30
उपोषणाआडून सुरू आहे राजकारण : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांचा आरोप
छत्रपती संभाजीनगर : मुस्लीम समाजाच्या मतांसाठी खा. इम्तियाज जलील यांनी जिल्ह्याच्या नामांतरावरून राजकीय नौटंकी सुरू केल्याची जाेरदार टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. त्यांना औरंगजेबाचा पुळका कशासाठी येत आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच आ. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थनदेखील त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा दिवसांपासून खा. जलील यांनी जिल्ह्याच्या नामांतरविरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला पोलिस प्रशासनाने परवानगी कशी दिली? इतर आंदोलनांना पोलिस यंत्रणा परवानगी देत नाहीत. केंद्र व राज्यातील सत्ताधारी म्हणून आपले काय मत आहे, यावर डॉ. कराड म्हणाले, पोलिस आयुक्तांना भेटून या प्रकरणी निवेदन दिले आहे.
खा. जलील यांनी नामांतरावरून मतदानाची मागणी केली आहे. यावर डॉ. कराड म्हणाले, मतदान घेऊन सरकारचा निर्णय कसा काय बदलणार? कारण जनतेने निवडून दिलेल्या केंद्र व राज्य सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर हेच नाव कायम राहील. त्यामुळे खा. जलील यांना संसदीय राजकारणातील सहकारी म्हणून माझे आवाहन आहे की, त्यांनी हे राजकारण बंद करावे. उपोषणाच्या आडून शहराची कायदा व सुव्यवस्था खराब करू नये. केंद्र व राज्य शासनाचा निर्णय स्वीकारून विकासाच्या राजकारणावर भर द्यावा.
त्यांनी आजवरच्या खासदारकीच्या कारकिर्दीत शहर व जिल्ह्याच्या विकासात काय योगदान दिले आहे, हे देखील जाहीर करावे, असे आव्हान डॉ. कराड यांनी दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, एजाज देशमुख यांची उपस्थिती होती.
औरंगजेबाचा पुळका कशासाठी?
सहकारमंत्री अतुल सावे म्हणाले, मुस्लिमांमध्ये तरी औरंगजेब असे नाव मुलांचे ठेवले जाते काय? यावरून औरंगजेब किती क्रूर होता, याचा अंदाज येताे. खा. जलील यांना औरंगजेबाचा पुळका कशासाठी आहे, हे त्यांनी सांगावे.