याला म्हणतात 'हात की सफाई'; केवळ पॉलिस्टर रुमालाने तोडला कडीकोयंडा, २२ लाख लंपास
By सुमित डोळे | Published: November 18, 2023 12:34 PM2023-11-18T12:34:55+5:302023-11-18T12:35:42+5:30
जालाननगरमधून २२ लाख रोख चोरणारा ४८ तासांत अटकेत, सीसीटीव्ही फुटेजवरून खबऱ्याने ओळखले
छत्रपती संभाजीनगर : स्क्रूड्रायव्हर, बनावट चावी, गज, छिन्नी इ. हत्यारांनी कडीकोयंडा तोडून घरफोड्या करणारे अनेक गुन्हेगार असतात. मात्र, केवळ पॉलिस्टरच्या रुमालाने मिनिटात पितळी कडीकोयंडा तोडून चोरी करणारा कुख्यात गुन्हेगार गुरुवारी गुन्हे शाखेच्या हाती लागला. सूर्यकांत उर्फ सनी गोपीनाथ जाधव (२७, रा. राजनगर, मुकुंदवाडी ) असे त्याचे नाव असून दोन दिवसांपूर्वीच्या जालाननगरच्या २२ लाखांच्या घरफोडीत त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
बांधकाम साहित्याचे व्यापारी मोहम्मद असिम मोहम्मद सईद शेख (रा. जालाननगर) हे ११ नोव्हेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. १५ नोव्हेंबर रोजी असिम घरी पोहोचल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे कळाले. घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोराने बेडरूममधील लॉकरमधील २२ लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. तेथीलच ताज रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्येही तशाच प्रकारे फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न झाला होता. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक संदीप सोळुंके तपास करत होते. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कैद झाला. त्याचा माग काढत असताना स्पष्ट फुटेज मिळताच गुन्हेगार, गुप्त बातमीदारांना ते पाठवण्यात आले. त्यातील एकाने हा कुख्यात सूर्यकांत असल्याचे सांगताच त्याचा शोध सुरू झाला.
पत्नी, साडूकडे पैसे ठेवले
असिम यांच्या घरात एकाच वेळी २२ लाख रोख सापडल्याने सूर्यकांत भलताच खूष होता. २४ तासांतच त्याने त्यातील ३० हजार रुपये उडवले. शिंदे यांच्यासह अंमलदार संजय मुळे, प्रकाश गायकवाड, विजय निकम, अमोल शिंदे, सुनील बेलकर, नितीन देशमुख, शाम आढे, शुभम वीर यांनी सापळा रचून त्याला मुकुंदवाडीतून ताब्यात घेतले. त्यानंतर पत्नी, साडूकडे लपवलेले पैसे जप्त केले.
तब्बल २४ गुन्हे दाखल
सूर्यकांतवर चोरी, लूटमारीचे तब्बल २४ गुन्हे दाखल आहेत. तो केवळ दिवसाच घरफोडी करतो. पितळाचा कडी कोयंडा केवळ पॉलिस्टरच्या रुमालाने मिनिटात तोडण्यासाठी चोरट्यांच्या टोळ्यांत तो कुप्रसिद्ध आहे. दिवसा सेल्समनची वेशभूषा करून घरफोडीच्या शोधात फिरतो. आयुक्त लोहिया, उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.