हा कोंडवाडा नाही, इथ मुले जन्मतात! घाटी रुग्णालयातील ९० खाटांच्या वॉर्डांत २०० माता

By संतोष हिरेमठ | Published: September 15, 2023 07:13 PM2023-09-15T19:13:29+5:302023-09-15T19:14:24+5:30

चार वॉर्डांत चालते जणू ‘मिनी जिल्हा रुग्णालय’च, नवीन इमारत स्वप्नवतच.

This is not a dungeon, children are born here! 200 mothers in 90-bed wards of Ghati Hospital Chhatrapati Sambhajinagar | हा कोंडवाडा नाही, इथ मुले जन्मतात! घाटी रुग्णालयातील ९० खाटांच्या वॉर्डांत २०० माता

हा कोंडवाडा नाही, इथ मुले जन्मतात! घाटी रुग्णालयातील ९० खाटांच्या वॉर्डांत २०० माता

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या वॉर्डांत गेल्यास हा रुग्णांचा वॉर्ड आहे की एखादा कोंडवाडा, असा प्रश्न पडतो. किती ही गर्दी? अक्षरश: कोंबून-कोंबून भरल्यासारखी स्थिती. ९० खाटांची मान्यता असताना प्रत्यक्षात रोज या ठिकाणी दोनशेवर महिला आणि त्यांचे शिशू दाखल असतात. चार वॉर्डांत जणू २०० खाटांचे ‘मिनी जिल्हा रुग्णालय’ चालत आहे. गर्दीमुळे प्रसूती झाली की लगेच ‘सुटी’ करावी लागते. या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागासाठी स्वतंत्र इमारत मिळणे स्वप्नवतच ठरत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह मराठवाड्यातील अनेक भागांतून सामान्य प्रसूतीसाठीही सरळ ‘घाटी’त येण्याचा. परिणामी, खाटाही अपुऱ्या पडतात. ‘घाटी’त माता आणि नवजात शिशूला एकाच छताखाली उपचार मिळावेत, यासाठी २०० खाटांचे स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्यात येणार होते; मात्र दूध डेअरी येथील जागेत २०० महिला व नवजात शिशू रुग्णालयाची उभारणी सुरू आहे. त्यामुळे ‘घाटी’तील प्रस्तावित इमारतच रद्द झाली. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी विविध प्रस्ताव देण्यात आले आहेत. यात स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या इमारतीसाठीही प्रस्ताव दिला आहे.

एका वार्डात हव्यात २० खाटा; पण...
एका वॉर्डात २० खाटा असाव्यात. प्रत्यक्षात प्रसूतिशास्त्र विभागाच्या एका वॉर्डात जवळपास ५० महिलांवर उपचार करण्याची वेळ ओढवत आहे. २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय होऊनही घाटीतील प्रसूती विभागावरील ताण कायम आहे.

१६० खाटा, बाकी गाद्याच
प्रसूती विभागात जवळपास १६० खाटा आहेत. तर ६० गाद्या (फ्लोअर बेड) आहे. अधिक रुग्णसंख्येमुळे फ्लोअर बेडवरही उपचार घ्यावा लागतो.

दर तासाला ३ प्रसूती
‘घाटी’त एकाच वेळी १५ महिलांची प्रसूती करण्याची सुविधा आहे. या ठिकाणी दर तासाला ३ महिलांची प्रसूती होते. १२ सप्टेंबर रोजी या ठिकाणी दिवसभरात ५२ प्रसूती झाल्या. तर ९ सिझेरियन प्रसूती झाल्या.

जागा निश्चित; पण प्रस्ताव कागदावरच
प्रसूतिशास्त्र विभागासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी जागा निश्चित झालेली आहे; मात्र गेल्या पाच वर्षांपासून नवीन इमारत कागदावरच आहे.

Web Title: This is not a dungeon, children are born here! 200 mothers in 90-bed wards of Ghati Hospital Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.