अपघात नव्हे शिंदे-फडणवीसांनी केलेली हत्या; समृद्धी मार्ग बंद करण्याची खा. जलीलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 02:07 PM2023-07-01T14:07:22+5:302023-07-01T14:09:20+5:30

बुलढाणा अपघातावर खासदार इम्तियाज जलील संतापले; पहिल्यांदा समृद्धी महामार्ग बंद करण्याची केली मागणी

This is not an accident but a murder committed by Shinde-Fadnavis; MP Imtiyaj Jalil's demand to close Smruddhi Mahamarga | अपघात नव्हे शिंदे-फडणवीसांनी केलेली हत्या; समृद्धी मार्ग बंद करण्याची खा. जलीलांची मागणी

अपघात नव्हे शिंदे-फडणवीसांनी केलेली हत्या; समृद्धी मार्ग बंद करण्याची खा. जलीलांची मागणी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी तर, 'मी याला अपघात म्हणणार नाही, ही हत्या आहे; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली हत्या' अशा शब्दात संताप व्यक्त केला. 

मन सुन्न करणाऱ्या अपघातानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर खासदार जलील यांनी देखील तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. सुविधा नसताना सरकार टिकेल कि नाही याची भीती असल्याने घाईत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे दररोज या मार्गावर अपघात होत आहेत. आज तर २५ जण गेले. मी याला अपघात नाही म्हणणार, ही हत्या आहे. यासाठी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री जबादार आहेत. आता ते फक्त सहानभूती मिळवण्यासाठी येत आहेत. पुन्हा एक मिडिया इव्हेंट करण्यासाठी दोघे येतील. त्यांच्या सरकारमध्ये माणसाची किंमत ५ लाख रुपये आहे, अशी जोरदार टीका खा. जलील यांनी केली. 

समृद्धी महामार्ग तत्काळ बंद करा
कुटलीही सुविधा नसताना घाईघाईत उद्घाटन केल्याने महामार्गावर मृत्यूसत्र सुरु आहे. देशात कोणत्याच मार्गावर एवढे अपघात झाले नाहीत. आता पहिल्यांदा हा महामार्ग काही दिवसांसाठी बंद करा. रोड सेफ्टी विभागाने अपघाताची कारणे शोधावी. फूडप्लाझा, स्वच्छातगृह सुविधा उभारा त्यानंतर महामार्ग पुन्हा सुरु करा, अशी मागणी खा. जलील यांनी यावेळी केली. 

आणखी एक मिडिया इव्हेंट करण्यासाठी आले
हे तर दोघंही खूप ज्ञानी आहेत. गाडीमध्ये बसा, मीडियाला सोबत घेऊन पुन्हा एक इव्हेंट करा. कुठलाही एक्स्प्रेस किंवा सुपर एक्स्प्रेस वे तयार होतो, तेव्हा रोड सेफ्टीचे नियम असतात. त्याचं क्लिअरन्स मिळालं आहे का तुम्हाला? काय दोष आहेत? इथे का अपघात होत आहेत? मी फक्त याच अपघाताबद्दल बोलत नाही. ज्या पद्धतीने यांनी उद्घाटनाचा इव्हेंट केला, फडणवीस गाडी चालवत होते, शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते, हा जो मीडिया इव्हेंट त्यांनी केला. त्यांना केवळ काळजी होती, की आपली सत्ता गेली, तर दुसरं कोणीतरी येऊन उद्घाटन करेल, म्हणून घाईघाईत केलं. त्याचे हे परिणाम आहेत. मी याला अपघात नाही म्हणणार, या हत्या आहेत. त्याला जबाबदार आहेत महाराष्ट्राचे हे दोन नेते, जे आज पुन्हा पाच लाख रुपयांची घोषणा करण्यासाठी आले आहेत., असेही खा. जलील म्हणाले.

Web Title: This is not an accident but a murder committed by Shinde-Fadnavis; MP Imtiyaj Jalil's demand to close Smruddhi Mahamarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.