‘आपले हे शेवटचे बोलणे’; दुपारपर्यंत निवांत, अचानक मित्रांना फोन करत तरुणाचे टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:57 PM2023-05-29T16:57:07+5:302023-05-29T16:57:40+5:30
फोननंतर ४० ते ५० कामगार मित्र त्याचा शोध घेण्यासाठी कनकोरी येथे तातडीने आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता
गंगापूर : ‘आपले हे शेवटचे बोलणे आहे. यानंतर बोलणे होणार नाही’, असे आपल्या मित्रांना व मोठ्या भावाला फोनवर कळवून तरुणाने स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील कनकोरी येथे शनिवारी (दि.२७) सायंकाळी ५:३० वाजता उघडकीस आली. नारायण अशोक पवार(वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
नारायण हा लिंबेजळगाव येथील एका खाजगी कंपनीत काम करीत होता. रोजच्या प्रमाणे शनिवारी दुपारी आपले काम संपवून तो स्वत:च्या दुचाकीवर कनकोरी गावाकडे निघाला होता. यादरम्यान त्याने आपला मोठा भाऊ योगेश व कंपनीतील सहकारी मित्रांना कॉल करून सांगितले की ‘आपले यानंतर कधीच बोलणे होणार नाही, हे शेवटचे संभाषण आहे’ असे म्हणून तो दुचाकीवर कनकोरी येथील स्वत:च्या शेतात आला व त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मोठ्या भावाने वडिलांना त्याचा शोध घ्यायला सांगितले होते, म्हणून नारायणचे वडील अशोकराव हे सायंकाळी ५:३० वाजता शेतात गेले असता, त्यांना नारायण झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी आक्रोश करताच आजूबाजूचे लोक जमा झाले, सर्वांनी मिळून नारायणचा मृतदेह खाली घेतला. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शनिवारी रात्री उशिरा नारायणाच्या पार्थिवावर कनकोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत नारायणाच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. घटनेची सिल्लेगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
दुपारपर्यंत हसत-खेळत होता
नारायण ज्या कंपनीत कामाला होता तेथील काही मित्रांना त्यांनी आपले शेवटचे बोलणे आहे, असे सांगितल्याने त्याचे कंपनीतील ४० ते ५० कामगार मित्र त्याचा शोध घेण्यासाठी कनकोरी येथे तातडीने आले होते; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते म्हणाले की, दिवसभर नारायण अगदी हसत खेळत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही ताणतणाव नव्हता. पोलिसांनादेखील त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नाही, त्यामुळे नारायणने आत्महत्या का केली हे समजू शकले नाही.