मराठा आरक्षणाचा हा शेवटचा लढा, कोणी विरोध केला तर गप्प बसणार नाही: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 06:24 PM2023-10-12T18:24:44+5:302023-10-12T18:25:08+5:30
मराठा आरक्षणाला विरोध करु नका, तुम्ही विरोध करताल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही
पैठण: जातीवंत मराठ्याची औलाद आहे. मराठा समाजासोबत कधीच गद्दारी करु शकत नाही. सरसकट मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता गप्प बसणार नाही, अशी ग्वाही मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जंरागे पाटील यांनी पैठण येथे जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. बुधवारी रात्री साडेनऊ ते अकरा दरम्यान पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मनोज जरांगे यांची सभा पार पडली. रात्री उशीर झालेला असतानाही सभेला मोठी गर्दी होती.
मनोज जरांगे यांचे पैठण शहरात आगमन होताच २४ जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटलावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आखतवाडा ता पैठण येथील ग्रामस्थ ५० ट्रक्टरच्या रॅलीसह पैठण येथे सभेला आले होते. छत्रपती शिवाजी चौकात गर्दीच्या दृष्टीने आजवरची सर्वात मोठी सभा ठरली. यावेळी पुढे बोलताना जंरागे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण व छत्रपतींना कोणी विरोध केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या बापदाद्यांनी तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही मोठे नेते झालात. याची जाणीव ठेवा, मराठा आरक्षणाला विरोध करु नका, तुम्ही विरोध करताल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्याचे नाव न घेता दिला.
ओबीसी आरक्षण ३० टक्क्यांवर कसे गेले
मराठा समाज आता जागा झाला असून शासनाने ४० दिवसाच्या मुदतीत मराठाआरक्षणाचा निर्णय घ्यावा. समाज आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास असून गायकवाड आयोगाने शिफारस करुनही आरक्षण दिले नसल्याने आंदोलन सुरु केले. १९९० साली १४ टक्के असलेले ओबीसी आरक्षण १९९४ साली ३० टक्के कसे झाले? असा सवाल जरांगे यांनी यावेळी केला. शासनाला पाच हजार कुणबींचे पुरावे मिळाले असल्याने शासनाने लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घेतला पाहीजे.
मराठा आरक्षणाचा हा शेवटचा लढा आहे
मराठ्यानो संघटीत व्हा, सरकारला धडकी भरेल असा मराठा आरक्षण मेळावा १४ ऑक्टोंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पार पडेल. हा मराठा आरक्षणाचा हा शेवटचा लढा आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेवटी जरांगे यांनी केले.