यंदा मराठवाड्यातून सुमारे ५० हजार मेट्रिक टन केशर आंबा युरोप, अमेरिकेत निर्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:00 IST2025-02-26T17:55:22+5:302025-02-26T18:00:02+5:30
मराठवाड्यातील केशर आंब्याला जगभरातून मागणी असते.

यंदा मराठवाड्यातून सुमारे ५० हजार मेट्रिक टन केशर आंबा युरोप, अमेरिकेत निर्यात
छत्रपती संभाजीनगर : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर आंब्याची चव विदेशी नागरिकांना चांगलीच भावली आहे. राज्यभरातील ९ हजार ४५९ आंबा बागांची या वर्षी कृषी विभागाकडे नोंदणी झाली आहे. यात मराठवाड्यातील सुमारे १५०० आमरायांचा समावेश असून त्यातून ४५ ते ५० हजार मेट्रिक टन केशर आंब्याची युरोपियन युनियन आणि अमेरिकाला निर्यात होण्याचा अंदाज आहे.
निर्यातक्षम आंबा बागांची नोंद करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. दरवर्षी महाराष्ट्रातून युरोपियन युनियन आणि अन्य देशांना आंब्यांची निर्यात होते. या निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. डिसेंबर २०२४ पर्यंत राज्यातील ९ हजार ४५९ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे.
मराठवाड्यातील केशर आंब्याला जगभरातून मागणी असते. गतवर्षी मात्र अपुऱ्या पावसामुळे केशर आंब्याचे उत्पादन घटल्याने स्थानिक बाजारातच केशर आंब्याला चांगला दर मिळत होता. यामुळे आंबा बागायतदारांनीही आंबा निर्यात करण्याऐवजी स्थानिक बाजारातच विक्री करण्यास प्राधान्य दिले होते. परिणामी, गतवर्षी मराठवाड्यातून केवळ ३० हजार मेट्रिक टन केशर आंब्याची निर्यात झाली होती. यंदा मात्र हवामान चांगले असल्याने आंब्याचे उत्पादनही वाढण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आगामी हंगामात सुमारे ४५ हजार ते ५० हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात होण्याचा अंदाज महाकेशर आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी वर्तविला आहे.
२८ फेब्रुवारीपर्यंत करा आंबा बागांची नोंदणी
निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी ऑनलाइन करणे बंधनकारक केले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या बागांची नोंदणी करता येणार आहे. बागायतदारांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून मँगोनेटद्वारे त्वरित अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी केले.
नोंदणीसाठी या कागदपत्रांची आवश्यकता
प्रथम नोंदणी व नूतनीकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा, नमुना आठ अ, बागेचा नकाशा आणि आधार कार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे कृषी अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.