काय सांगता, यंदा गुळासोबत ‘तीळ’ही गोड झाला; कमी झाले तिळाचे भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 19:48 IST2025-01-04T19:46:57+5:302025-01-04T19:48:23+5:30

आपल्या शहरात गुजरात राज्यातील ‘उंझा’ या मसाल्याच्या मोठ्या मार्केटमधून ‘तीळ’ मागविला जातो.

this year, along with jaggery, 'sesame' has also become sweet; sesame prices have decreased | काय सांगता, यंदा गुळासोबत ‘तीळ’ही गोड झाला; कमी झाले तिळाचे भाव

काय सांगता, यंदा गुळासोबत ‘तीळ’ही गोड झाला; कमी झाले तिळाचे भाव

छत्रपती संभाजीनगर : नववर्षातील पहिला सण ‘मकरसंक्रांत’ अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. ‘तीळगुळ घ्या गोड गोड बोला’ असा संदेश या सणातून मिळतो. यासाठी तीळगुळाचा लाडू एकमेकांना दिला जातो. गुळ गोड असतोच, पण यंदा ‘तीळ’ गोड झाला आहे. आता तुमच्या मनात शंका निर्माण झाली असेल की, ‘तीळा’ची चव गोड लागत नाही. पण, आता तुम्ही बाजारात तीळ खरेदीसाठी जाल, तर मागील वर्षीपेक्षा यंदा तीळ किलोमागे २० रुपयांनी स्वस्त मिळेल. यामुळे तीळगुळाची गोडी आणखी वाढणार आहे.

का कमी झाले तिळाचे भाव
यंदा गुजरातसह राजस्थान, मध्य प्रदेश या तीळ उत्पादक राज्यात तिळाचे उत्पादन समाधानकारक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत किलोमागे २० रुपयांनी तीळ स्वस्त झाला आहे. मागील संक्रांतीला १९० ते २०० रुपये प्रतिकिलो तीळ विक्री झाला होता. सध्या १७० ते १८० रुपये किलोने तीळ मोंढ्यात विकला जात आहे.

दररोज ३ टन तिळाची आवक
आपल्या शहरात गुजरात राज्यातील ‘उंझा’ या मसाल्याच्या मोठ्या मार्केटमधून ‘तीळ’ मागविला जातो. मागील १५ दिवसांपासून होलसेल बाजारात दररोज अडीच ते तीन टन तिळाची आवक होत आहे. येत्या १० जानेवारीपर्यंत ही आवक टिकून राहील. तिळाची वर्षभरातील एकूण विक्रीपैकी ६० टक्के विक्री संक्रांतीला होते.

अवघ्या १ इंचाची गुळाची भेली बाजारात
३० किलो गुळाची भेली बाजारात मिळते. पण, दरवर्षी ही भेल लहान होत चालली आहे. अर्धा किलो, पावशेरची भेल संक्रांतीला वाणासाठी जास्त विकली जाते. पण, आता बाजारात अवघ्या १ इंचाची गुळाची भेल आली आहे. १४ ते १६ ग्रॅम वजन एका गुळ भेलीचे आहे. एका किलोत ९० ते १०० भेली बसतात. हा नॅनो गुळ १३० रुपये किलोने विकला जात आहे.

गुळाची दररोज ५० टन आवक
सांगली, कराड या भागातून मोंढ्यात दररोज ५० टन गुळाची आवक होते. ४८ ते ५० रुपये किलोने हा गुळ विकत आहे. लातूर येथील गावरान गुळाची आवक येत्या ८ दिवसांनी वाढेल. तेव्हा दररोज गुळाची आवक वाढून १०० टनपर्यंत जाईल. गावरान गुळ किरकोळ विक्रीत ५४ ते ५५ रुपये किलोने विकला जाईल. मागील वर्षी गुळाचे हेच भाव होते.

आता चिक्कीच्या गुळाची एक किलोची भेल
मागील वर्षीपर्यंत चिक्कीच्या गुळाची ३० किलो, १० किलोची भेली येत असत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना ही भेल घेण्यास परवडत नसे. यामुळे उत्पादकांनी यंदा चिक्कीच्या एक किलोच्या भेली विक्रीसाठी आणल्या आहेत. किरकोळ विक्रीत ५५ ते ६० रुपये किलोनेही चिक्कीचे भेल विकत मिळत आहे.

Web Title: this year, along with jaggery, 'sesame' has also become sweet; sesame prices have decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.