यंदा लाडके दैवत बाप्पाचे आगमन लांबले; १९ दिवस उशिराने होणार गणरायाचे आगमन
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 22, 2023 03:45 PM2023-06-22T15:45:13+5:302023-06-22T15:46:06+5:30
मागील वर्षी ३१ ऑगस्ट २०२२ ला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला होता.
छत्रपती संभाजीनगर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशी विनंती व जयघोष मागील वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक गणेशभक्तांनी गणपती बाप्पाला पाहून केला होता. मात्र, यंदा महाराष्ट्राचे लाडके दैवत गणाधिपतीचे आगमन मागील वर्षीपेक्षा तब्बल १९ दिवस उशिराने होणार आहे. यंदा मूर्ती तयार करण्यासाठी अधिकचा वेळ मिळाल्याने मूर्तिकारही मूर्ती घडविण्यासाठी जोमाने कामाला लागले आहे. म्हणूनच तर शहरात दीड लाखापेक्षा अधिक मूर्ती तयार केल्या जात आहे.
गणपती बाप्पाचे कधी होणार आगमन
मागील वर्षी ३१ ऑगस्ट २०२२ ला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला होता. मात्र, यंदा १९ सप्टेंबर २०२३ या दिवशी गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाला सुरुवात होईल. २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. १० दिवस गणरायाचा मुक्काम असणार आहे. पण यासाठी गणेशभक्तांना गणेशोत्सवाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
का होणार उशिरा बाप्पाचे आगमन
यंदा ‘अधिक मास’ आला आहे. १८ जुलैपासून अधिक मासाला सुरुवात होईल व १६ ऑगस्टला अधिक मासाची सांगता होईल. यामुळे गणरायाचे आगमन १९ दिवस लांबले आहे.
मूर्तिकारांच्या हातात अजून ८८ दिवस
गणेशोत्सव सुरु होण्यासाठी अजून ८८ दिवस बाकी आहेत. मूर्तिकारांनी मार्च महिन्यापासूनच मूर्ती घडविण्याची लगबग सुरु केली आहे. जसजसे दिवस जात आहे तसतसे मूर्ती बनविण्याचा वेग वाढत आहे. सध्या मूर्ती बनविणे व त्याचे फिनिशिंग करणे सुरु आहे. ५० दिवसांनंतर रंगरंगोटीचे काम सुरु होईल. यासाठी मूर्तिकारांचे कुटुंबच कामाला लागले आहे.
गणेशाची साकारताहेत वेगवेगळी रुपे
मूर्तिकार सदैव गणपती बाप्पा विविध रुपात साकारण्याचा प्रयत्न करीत असतो. यंदा अधिक मासामुळे जास्तीचा वेळ मिळाला आहे. यामुळे बाप्पाच्या नवीन स्वरुपातील मूर्ती घडविण्यासाठी मोठा वाव मिळाला आहे. या संधीचा आम्ही फायदा घेत आहोत. भाविकांना नवीन मूर्ती यावेळी दिसतील.
- दिनेश बगले, मूर्तिकार