यंदा प्रचारात रील्स, व्हिडीओ, ग्राफिक्सचा बोलबाला; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वाढला भाव
By संतोष हिरेमठ | Published: April 10, 2024 06:02 PM2024-04-10T18:02:42+5:302024-04-10T18:04:13+5:30
राजकीय पक्षांच्या डिजिटल शाखांकडून जोरात तयारी : रील्स, व्हिडीओ, फोटोच्या माध्यमांतून तरुण मतदारांना करणार आकर्षित
छत्रपती संभाजीनगर : सध्याची तरुणाई सोशल मीडियावर रील्स, व्हिडीओ, फोटो अपलोड आणि लाइक, कमेंट, शेअर करण्यात व्यस्त असते. त्यामुळे लोकसभेचा प्रचार गल्लोगल्लीसह सोशल मीडियावरही रंगणार आहे. हटके रील्स, व्हिडीओ, फोटोच्या माध्यमांतून तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदा प्रचारात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर भाव खाणार, असे दिसते.
सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो आणि मिनिटा-मिनिटाला व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स यांसारख्या सामाजिक माध्यमांवर कोणी काय पोस्ट केली, हे पाहण्यात प्रत्येकजण व्यस्त असतो. त्यामुळेच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया सांभाळणारी स्वतंत्र यंत्रणा आणि डिजिटल शाखा तयार केलेली आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी खास रणनीतीही आखली जात आहे. गेल्या काही काळात विविध गोष्टींचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा आधार घेतला जात आहे. कारण या इन्फ्लुएन्सरचे हजारो फाॅलोअर्स असतात. त्यांच्या एका पोस्टच्या माध्यमातून एकाच वेळी हजारोंपर्यंत एखादी गोष्ट पोहोचते. हीच बाब ओळखून यंदा प्रचारात इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून उमेदवाराची, पक्षाची माहिती कशाप्रकारे पोहोचवता येईल, याची रणनीती विविध पक्षांकडून आखली जात आहे. त्याबरोबर राजकीय पक्षांतील डिजिटल शाखांतील पदाधिकारीही रील्स, पोस्ट, फोटोतून सोशल मीडियावरून मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केल्याचेही पाहायला मिळत आहे.
२०१९च्या तुलनेत आता वाढला इंटरनेट वापर
लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय स्वतंत्र व्हॉट्सॲप्स ग्रुप आणि ब्रॉडकास्टिंग तयार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्सवर फोटो, भाषणाचे व्हिडीओ, रील्स अपलोड केले जातात. २०१९ मध्ये घरातील एक सदस्य मोबाइल वापरत होता. मात्र, आता जवळपास लहानथोर मंडळी इंटरनेट वापरतात. त्यामुळे थेट कनेक्टव्हिटी वाढली. इन्फ्लुएन्सर, मोटिव्हेशनल वक्ते आदींची मदत घेऊन त्या त्या प्रवर्गातील लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. व्होटर ॲप्स, वाॅररूम, मीडिया को-ऑर्डिनेटरच्या माध्यमातून प्रभावी प्रचार सुरू आहे.
- गणेश वाघ, राज्य समन्वयक,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) डिजिटल शाखा
इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव समाजात परावर्तित होताना दिसतो. निवडणुकीत या इन्फ्लुएन्सर्सची भूमिका नक्कीच निर्णायक ठरणार आहे. इन्फोग्राफिक्स, व्हिडीओ, रील्स याचा वापर काँग्रेस करणार आहे.
- प्रतीक पाटील, भारत जोडो वॉरिअर्स, महाराष्ट्र समन्वयक