यंदा १५० वर्ष जुन्या रथातून होणार अखेरचे सीमोल्लंघन; जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर नवा रथ बनणार
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 21, 2023 01:12 PM2023-10-21T13:12:37+5:302023-10-21T13:13:02+5:30
कर्णपुऱ्यात आहे १५० वर्ष जुना सागवानी लाकडाचा रथ, यंदा या रथाला सोनेरी रंग देण्यात आला आहे. याच रथात श्री बालाजी भगवंतांची उत्सवमूर्ती ठेवण्यात येईल व विजयादशमीला या रथासह शहरवासीय सीमोल्लंघन करतील.
छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा यात्रेत देवीचे दर्शन घेतल्यानंतर पाठीमागील बाजूस श्री बालाजी मंदिराकडे जाताना सर्वांना सागवानी रथ बघण्यास मिळत आहे. होय हा संपूर्ण सागवानी रथ तब्बल १५० वर्षे जुना आहे. या रथाचे खालच्या मजल्यावरील खांब दरवर्षी झिजत असल्याने नवीन रथ तयार करण्याचा मानस येथील पुजारी परिवाराने केला आहे. त्यानुसार पुढील वर्षी २०२४ च्या विजयादशमीला बालाजी भगवंत नवीन रथात विराजमान होऊन सीमोल्लंघन करणार आहे.
बिकानेरचे राजा कर्णसिंह हे १८३५ मध्ये शहरात वास्तव्यास आले होते. त्यांच्याच नावाने येथील कर्णपुरा परिसर ओळखला जातो. कर्णसिंह राजा हे देवीचे मोठे भक्त होते. त्यांनी कर्णपुऱ्यात देवीचे छोटे मंदिर त्याकाळीच उभारले होते. त्यानंतर पाठीमागील बाजूस श्री बालाजी भगवंतांचे मंदिर उभारण्यात आले. सध्या कर्णपुरा देवीच्या मंदिराचा कारभार तेथील दानवे कुटुंबीय, तर बालाजी मंदिराचा कारभार पुजारी परिवार बघत आहे. दोन्ही मंदिरांचा कारभार स्वतंत्र आहे. अडीचशे वर्षांपासून विजयादशमीला बालाजी मंदिरातून रथयात्रा काढण्याचीही जुनी परंपरा आहे. वर्षातून एकदा बालाजी भगवंत विजयादशमीच्या दिवशी मंदिराबाहेर येतात व सागवानी रथात वरच्या मजल्यावर विराजमान होऊन पंचवटी चौकात जातात व तिथे सीमोल्लंघन करून पुन्हा मंदिरात येतात. यासाठी १५० वर्षांपूर्वी सागवान लाकडाचा दोन मजली रथ तयार करण्यात आला. तो अजूनही कार्यरत आहे.
पूर्वी या रथाला लाकडी चाके होती. त्यास लोखंडी पट्ट्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र, ३० वर्षांपूर्वी ही लाकडी चाके काढून तिथे टायर बसविण्यात आले. मात्र, आता सागवानी लाकडाची झीज होत आहे. दरवर्षी दुरुस्तीसाठी मोठा खर्च येत आहे. त्याऐवजी नवीन रथ तयार करावा, असा विचार पुजारी परिवाराच्या मनात आला. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहे. यासाठी शहरातील दानशूर व्यक्ती पुढे सरसावले आहे. पुढील वर्षी नवीन रथ तयार होईल, असे येथील पुजारी राजेंद्र पुजारी यांनी सांगितले.
जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर रथ बनविणार
जगन्नाथ पुरी येथे उत्तमरीत्या रथ बनविला जातो. तिथे आम्ही भेट देऊन आलो. आम्ही सागवानी लाकडात कायमस्वरूपी रथ बनविणार आहे. त्यासाठी जगन्नाथ पुरी येथील कारागिरांना शहरात बोलाविणार आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुजारी परिवार व सर्व दानशूरांच्या सहकार्याने दोन मजली रथ तयार करण्यात येईल.