यंदा 'बकरी ईद'दिवशी कुर्बानी नाही, 'आषाढी'मुळे मुस्लीम बांधवांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 07:16 PM2023-06-22T19:16:47+5:302023-06-22T19:18:25+5:30
आषाढी एकादशी हा हिंदुसाठी, विशेषत: वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो.
छत्रपती संभाजीनगर - राज्यात २९ जून रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीची वारी करत मजल-दरमजल करत विठु-माऊलीच्या भेटीसाठी चालत आहेत. शासनही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झालं असून पंढरपुरात १० लाख वारकऱ्यांचा मेळा जमणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपूरला आषाढीचं मोठं महत्त्व आहे. मात्र, यंदाच त्याचदिवशी बकरी ईद असल्याने छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील मुस्लीम बांधवांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशी हा हिंदुसाठी, विशेषत: वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. यादिवशी बहुतांश सर्वजण उपवास धरुन विठ्ठल भक्ती साजरी करतात. या दिवशी मांसाहर पूर्णपणे टाळला जातो. मात्र, यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. दरम्यान अशा परिस्थितीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम एकतेचं उदाहरण पाहायला मिळाले आहे. तर मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
वाळूजमधील मुस्लीम बांधवांनी हिंदू धर्माचा आदर करत आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी बकरी ईद बकरा कुर्बानी न देता साजरा करण्याचा निर्णय घेतला. विशे, म्हणजे बकरी ईद हा मुस्लीम बांधवांचाही महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव मानला जातो. मात्र, वाळूजमधील मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या ह्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.