यंदाही औरंगाबादकरांचा उन्हाळा त्रासदायक, ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकायला जागाच नाही
By मुजीब देवणीकर | Published: February 1, 2023 03:21 PM2023-02-01T15:21:04+5:302023-02-01T15:22:41+5:30
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे विदारक चित्र
औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात औरंगाबादकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची आणखी एक जलवाहिनी टाकण्याचा निर्णय मार्च २०२२ मध्ये घेण्यात आला. वर्ष उलटत आले तरी या कामाचा अद्याप श्रीगणेशाच झाला नाही. आता काम सुरू करायचे म्हटले तर जलवाहिनी टाकण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याची बाब समोर आली. यंदाही औरंगाबादकरांना पाणीटंचाईचा मुकाबला करावाच लागणार आहे.
शहराची तहान भागविण्यासाठी १९७५ मध्ये पहिल्यांदा जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. नंतर १९९२ मध्ये १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. या दोन्ही जलवाहिन्यांद्वारे १२० एमएलडी पाणी दररोज शहरात येते. शहराची तहान भागविण्यासाठी किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. कायमस्वरूपी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गंत तब्बल २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे कामही सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दीड वर्ष लागणार आहे. तेव्हापर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी आणखी एक ९०० मिमी व्यासाची योजना टाकण्याची संकल्पना काही अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून आली. शासनानेही १९३ कोटींच्या या योजनेला मान्यता दिली. अमृत-२ मध्ये या योजनेला मंजुरी घेतली. मंजुरीच्या अधीन राहून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार टप्प्यांत निविदा प्रक्रिया राबविली. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक संपताच कामाला सुरुवात होणार आहे.
आता जागेचा शोध सुरू
७०० मिमी व्यासाच्या बाजूलाच १४०० मिमीची जलवाहिनी आहे. आणखी थोड्या बाजूला २५०० मिमीची सर्वांत मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. आता ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी कुठे टाकावी, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी तर जागाच शिल्लक नाही. जिथे जागा उपलब्ध आहे, तेथे तारेवरची कसरत करीत जलवाहिनी टाकावी लागेल. जुन्या दोन्ही जलवाहिन्या तीन ठिकाणी ‘क्राॅस’ झालेल्या असल्यामुळे ९०० मिमीची जलवाहिनी टाकताना जमिनीची अडचण निर्माण होणार आहे.