यंदा दुप्पट पाणीसाठा, तरीही टंचाईच्या झळा; मराठवाडा हळूहळू टँकरच्या फेऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:45 IST2025-03-25T18:43:53+5:302025-03-25T18:45:00+5:30

तापमान वाढत असल्यामुळे जलसाठ्यातील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे.

This year, water reserves have doubled, but there are still shortages; Marathwada is gradually getting tankers | यंदा दुप्पट पाणीसाठा, तरीही टंचाईच्या झळा; मराठवाडा हळूहळू टँकरच्या फेऱ्यात

यंदा दुप्पट पाणीसाठा, तरीही टंचाईच्या झळा; मराठवाडा हळूहळू टँकरच्या फेऱ्यात

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील मोठ्या, लघू आणि मध्यम प्रकल्पांत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट जलसाठा आहे, तरीही विभाग हळूहळू टँकरच्या फेऱ्यात येऊ लागला आहे. विशेषत: जायकवाडी धरण असतानाही विभागाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत.

तापमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. विभागात सोमवारी सरासरी ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. तापमान वाढत असल्यामुळे जलसाठ्यातील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. सर्व जिल्ह्यांना पुढील तीन महिन्यांसाठी टंचाई आराखडा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आठ जिल्ह्यांतील ३ वाड्या मिळून २४ गावांमध्ये सध्या १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुढील तीन महिन्यांत हा आकडा ३००च्या आसपास जाण्याची शक्यता असून, टँकरचा आकडा ४०० च्या आसपास असेल. ७० विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ तर नांदेडमध्ये २ टँकर सध्या सुरू आहेत. उर्वरित जिल्ह्यांतून टँकरची मागणी येत असल्याचे विभागीय प्रशासनाने सांगितले. जायकवाडी धरणात सध्या ५७.६१ टक्के जलसाठा आहे. मागच्या वर्षी २४ मार्च रोजी २३.१६ टक्के जलसाठा होता.

विभागात सध्या असलेला जलसाठा
मोठे प्रकल्प : ४४
आजचा जलसाठा : ५५.२७ टक्के
मागच्या वर्षीचा जलसाठा : २३.७४ टक्के
मध्यम प्रकल्प : ८१
आजचा जलसाठा : ४३.२८ टक्के
मागच्या वर्षीचा जलसाठा : २१.६५ टक्के
लघू प्रकल्प: ७९५
आजचा जलसाठा : ३१.९८ टक्के
मागच्या वर्षीचा जलसाठा : १८.५५ टक्के

Web Title: This year, water reserves have doubled, but there are still shortages; Marathwada is gradually getting tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.