हा तरुण मावळा रोजच साजरी करतो शिवजयंती;पगार अत्यल्प असूनही पुतळ्यासाठी हार,फुलांवर खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 02:16 PM2022-02-19T14:16:56+5:302022-02-19T14:17:35+5:30
शिवजयंती विशेष: वर्षभर छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्वच्छतेकडे कुणाचेही लक्ष नसते, ही बाब त्याच्या जिव्हारी लागली.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : शिवरायांवर निस्सीम श्रद्धा असलेला तरुण दोन वर्षांपासून पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रोज स्वच्छता आणि मनोभावे पूजन करत आहे. हा अवलिया तरुण सध्या पुंडलिकनगर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. खासगी नोकरी करून मिळणाऱ्या अत्यल्प पगारातून तो छत्रपतींच्या पुतळ्यासाठी हार आणि फुलांवर खर्च करतो.
अक्षय दादाराव पाटील (२३, रा. हुसेन कॉलनी) असे या अवलिया शिवप्रेमीचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी तो घराजवळील पुंडलिकनगर चौकात उभा होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर धूळ साचलेली दिसली. शिवजयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंतीला या पुतळ्यांची शिवप्रेमी स्वच्छता करतात, मात्र यानंतर वर्षभर छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्वच्छतेकडे कुणाचेही लक्ष नसते, ही बाब त्याच्या जिव्हारी लागली. यानंतर पुतळ्याची नियमित स्वच्छता करण्याची खूणगाठ त्याने बांधली. लोडिंग रिक्षा चालविणाऱ्या त्याच्या वडिलांनीही त्यास प्रोत्साहन दिले. तो नित्यनेमाने हंडा आणि बादली भरून पाणी घेऊन चौकात जातो. छत्रपतींच्या पुतळ्याला पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर पुष्पहार विकत आणून पुतळ्याला घालतो. केवळ तीन हजार रुपये वेतन असताना तो हा खर्च करतोय. काही जणांनी त्याला हार, फुलांचे पैसे देतो, असे सांगितले, मात्र कोणीही आजपर्यंत त्याला एक रुपयाही दिलेला नाही.
दोन महिन्यांपासून वडिलांनी केली पुतळ्याची स्वच्छता
डिसेंबर २०१९ पासून अक्षयचे हे कार्य अविरत सुरू असताना दोन महिन्यांपूर्वी त्याची प्रकृती खराब झाली. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. या काळात खंड पडू नये, म्हणून त्याचे वडील दादाराव पाटील यांनी छत्रपतींच्या पुतळ्याची स्वच्छता केली. आता तो पूर्णपणे बरा झाल्याने त्याने पुन्हा त्याचे कार्य सुरू केले आहे.