‘त्या’ ३८ जणांविरुद्ध होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:21 AM2017-08-25T00:21:47+5:302017-08-25T00:21:47+5:30
शौचालय न बांधताच अनुदान लाटणाºया ३८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याला पत्रही दिले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शौचालय न बांधताच अनुदान लाटणाºया ३८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याला पत्रही दिले आहे. सहा हजार रूपये पहिला हप्ता घेऊन फसवणूक केल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली असून आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.
बीड शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. शौचालय बांधा, वापरा तसेच सार्वजनिक शौचालयांचा वापर करा, यासंदर्भात सुचना व आवाहन केले जाते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालयांसाठी १७ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. त्यानुसार पालिकेच्यावतीने काही लाभार्थ्यांना अनुदान वाटपही करण्यात आलेले आहे.
परंतु काही लोकांनी अनुदान घेत नगर पालिकेची फसवणूक करीत शौचालयच बांधले नाहीत. हा प्रकार स्वच्छता निरीक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. त्यानंतर स्वच्छता निरीक्षकांनी अशा लोकांची यादी करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मुख्याधिकारी यांच्याकडे परवाणगी मागितली. त्याप्रमाणे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी अनुदान लाटणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा दिले. तब्बल ३८ लोकांची यामध्ये नावे आहेत.