बिबट्याचे 'ते' व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरचे नाहीत; जुने व्हिडीओ व्हायरल, नागरिकांत संभ्रम

By सुमेध उघडे | Published: July 19, 2024 06:25 PM2024-07-19T18:25:16+5:302024-07-19T18:31:15+5:30

छत्रपती संभाजीनगरात बिबट्या अद्याप मोकाटच; जुने व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांत संभ्रम

'Those' leopard videos are not from Chhatrapati Sambhajinagar; Old videos viral, confusion among citizens | बिबट्याचे 'ते' व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरचे नाहीत; जुने व्हिडीओ व्हायरल, नागरिकांत संभ्रम

बिबट्याचे 'ते' व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरचे नाहीत; जुने व्हिडीओ व्हायरल, नागरिकांत संभ्रम

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी पहाटे शहरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर विविध भागात बिबट्याचा वावर सुरूच आहे. बिबट्या पकडण्यात अद्याप यश आले नाही. मात्र यादरम्यान शहरात इतर ठिकाणचे जुने व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. बंगळुरू, नाशिक येथील जुने व्हिडिओ शहरातील असल्याचे मेसेज सोशल मिडियात व्हायरल झाल्याने नागरिकांत संभ्रम असून प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

उल्कानगरी, शंभुनगर, फतियाबाद व सातारा डोंगराच्या मागे पांगरा परिसरात अशा शहराच्या चारही बाजूंनी गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. बुधवारी पहाटे तर बिबट्या चक्क ‘प्रोझोन मॉल’मध्येच शिरला. बिबट्या ‘प्रोझोन मॉल’मध्ये आल्याचे २४ तासांनंतर कळले. त्यानंतर मॉल परिसरात गुरुवारी तीन पिंजरे लावले. दरम्यान, सोमवारी पहिल्यांदा बिबट्याचे दर्शन झाल्यापासून शहरात इतर ठिकाणची जुनी व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे सर्वजण रेस्क्यू टीमला विचारणा करत आहेत. सर्व सोडून ही टीम व्हायरल व्हिडिओवर लक्ष देऊन त्याची शहानिशा करत आहे. याचा परिणाम बिबट्या पकडण्याचा मोहिमेवर देखील होत आहे. 

पहिला व्हिडिओ:दर्गा उड्डाणपूलाजवळ बिबट्या
शुक्रवारी सकाळीच विविध सोशल मीडिया ग्रुपमध्ये बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. उड्डाणपुलाच्या बाजूला बिबट्या बसलेला असून तो डरकाळी फोडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. समोरून एक दुचाकी येत आहे तर बाजूने एक हिरव्या रंगाची बस जात असल्याचे दिसते. फॅक्ट चेक केले असता हा व्हिडिओ बंगळुरू येथील १९ एप्रिल २०२३ चा असल्याचे यु ट्यूबवर दिसून आले.

दूसरा व्हिडिओ: बिबट्या आलीशान घरात पकडला
त्यानंतर दुपारी एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात बिबट्या शहरातील सिडको एन-१ भागातील आलीशान भागातील एका घरात पकडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा व्हिडिओ देखील जुना असल्याचे सिद्ध झाले. हा व्हिडिओ नाशिक येथील १९ नोव्हेंबर २०२३ चा असल्याचे ट्विटरवर दिसून आले.

शहानिशा करा, संयम बाळगा
सोशल मिडियात विविध मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. फॉरवर्ड करण्याच्या आधी त्याची शहानिशा करा. अशा मेसेजमुले नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच रेस्क्यू टीमच्या कामात देखील यामुळे अडथळा येत आहे. 
- सूर्यकांत मंकावार, उपवनसंरक्षक, प्रादेशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर

असे झाले बिबट्याचे दर्शन
प्रथम- सोमवारी पहाटे उल्कानगरी वेळ- पहाटे ३:४७
दुसऱ्यादा- मंगळवारी पहाटे शंभुनगरात पोद्दार शाळेच्या मागे.-वेळ पहाटे ३:३०
तिसऱ्यांदा - बुधवारी काबरानगर वेळ- पहाटे ३:३० वाजेदरम्यान
चौथ्यांदा- माळीवाडालगत फतियाबाद येथील शेतात दोन पिलांसह मादी रात्री ९:३० वाजता.
पाचव्यांदा- बुधवारी- गजबजलेल्या सिडको परिसरातील ‘प्रोझोन माॅल’च्या पार्किंग गेट परिसरात एमआयडीसी चिकलठाणा परिसरातून आगमन झाले.

Web Title: 'Those' leopard videos are not from Chhatrapati Sambhajinagar; Old videos viral, confusion among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.