‘त्या’ पोलिसांवरील कारवाईस चालढकल!
By Admin | Published: May 3, 2016 11:57 PM2016-05-03T23:57:05+5:302016-05-04T00:07:36+5:30
बीड : कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एरवी तडकाफडकी कारवाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाने दोन गंभीर प्रकरणांत मात्र वेळकाढू भूमिका घेतली आहे.
नोटिसांचा फार्स: अंमळनेरमधील आरोपीचे पलायन; माजलगावात निरीक्षकांनी शर्ट काढल्याचे प्रकरण
बीड : कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एरवी तडकाफडकी कारवाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाने दोन गंभीर प्रकरणांत मात्र वेळकाढू भूमिका घेतली आहे. अंमळनेर (ता. पाटोदा) येथील पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून आरोपीने पलायन केले होते तर माजलगाव शहर ठाण्याच्या निरीक्षकांनी शर्ट काढून धिंगाणा घातल्याच्या प्रकरणांत सात दिवसानंतरही कारवाई केली नाही. केवळ नोटिसांचा फार्स करण्यात आला आहे.
लहू मोहन मोरे (रा. कापसी ता. आष्टी) याला विद्युतपंप चोरी प्रकरणात अंमळनेर पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी रात्री शेतात लपवून ठेवलेला विद्युतपंप शोधण्यासाठी त्याला कोठडीबाहेर काढले होते. अंमळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक संतोष बुधावंत, सहायक फौजदार अरुण दाणी, पोहेकॉ बाळासाहेब सिरसाट, भागवत शिंदे यांना गुंगारा देऊन मोर पळाला आहे. तो अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही.
याप्रकरणी उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांनी त्याच दिवशी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना अहवाल पाठविला होता; परंतु संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस पाठवून सोपस्कार केला आहे.
माजलगाव प्रकरणातही
वेळकाढू भूमिका
माजलगाव येथे २७ एप्रिल रोजी शहर ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत हरगबाळ यांनी शर्ट काढले होते. यावेळी त्यांचा कर्मचाऱ्यांसोबत वादही झाला होता. या प्रकरणात अंबाजोगाईचे अप्पर अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, सहायक निरीक्षक डॉ. एन. हरि बालाजी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून हरगबाळ यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचे जवाब नोंदविले होते. शर्ट काढल्याच्या या प्रकरणाने पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला. याची सर्वत्र चर्चा झाली. मात्र, अधीक्षक पारसकर यांनी गरमीमुळे हरगबाळ यांनी शर्ट काढल्याचे सांगून सावरासावर केली. (प्रतिनिधी)
...या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात
अंमळनेर पोलिसांनी लहू मोरे या आरोपीला रात्री आठ वाजता अंधारात विद्युतपंप जप्त करण्यासाठी कोठडीबाहेर कसे काय काढले?
तो कोठडीत होता, तर दिवसाची सुरक्षित वेळ का निवडली नाही?
माजलगाव शहर ठाण्याच्या निरीक्षकाच्या शर्ट काढल्याच्या प्रकरणात ‘फुल्ल टू’ चर्चा झाली, मग वैद्यकीय तपासणी का केली नाही.
दोन्ही प्रकरणे गंभीर असताना कारवाईस विलंब का?
अंमळनेर येथील आरोपी पलायन प्रकरणात संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना शो- कॉज नोटीस दिली आहे. माजलगाव प्रकरणातही कारवाई प्रस्तावित केली आहे.
- अनिल पारसकर, पोलीस अधीक्षक़