दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्यांना पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:03 AM2021-03-14T04:03:21+5:302021-03-14T04:03:21+5:30
लासूर स्टेशन : नागपूर-मुंबई महामार्गावरील लासूर स्टेशनजवळ असलेल्या एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपलेल्या सहा जणांपैकी दोन जणांना पोलिसांना ...
लासूर स्टेशन : नागपूर-मुंबई महामार्गावरील लासूर स्टेशनजवळ असलेल्या एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपलेल्या सहा जणांपैकी दोन जणांना पोलिसांना अटक केले, तर चार जण पसार झाले. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लासूर स्टेशन परिसरात शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास पोलीस गस्त घालत होते. तेव्हा महामार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ काही इसम अंधारात लपलेले होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी संशयितांकडे मोर्चा वळविला. तोच चोरट्यांनी कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून दोन जणांना ताब्यात घेतले. चार जण फरार झाले. जप्त करण्यात आलेल्या कारमध्ये लोखंडी रॉड, गज, लाकडी काठ्या, तलवार ही हत्यारे मिळून आली. पोलिसांनी अधिक विचारणा केली असता दरोडा, चोरी करण्याच्या उद्देशाने आलो असल्याचे समोर आले. प्रमोद शिरसाट, जितू गायकवाड (रा. डोमेगाव) यांना अटक करण्यात आली.
याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात प्रमोद शिरसाट, जितू गायकवाड (दोघे रा. डोमेगाव) पकडलेले संशयित आरोपी व ताराचंद भोसले, रवी भोसले, शक्तूर भोसले, सोनू (सर्व रा. गाजगाव, ता. गंगापूर) व पसार झालेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, अमोल ढाकणे, हेडकॉन्स्टेबल पवार, कॉन्स्टेबल दुलत, अनिल दाभाडे करीत आहेत.