चेकनाक्यावर पॉझिटिव्ह येणारे मुकणार परीक्षेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:04 AM2021-03-20T04:04:27+5:302021-03-20T04:04:27+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवशांची ...
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवशांची शनिवारपासून अँटिजेन तपासणी केली जाणार आहे. तथापि, रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून येणार असून त्यांना अँटिजेन तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. यापैकी काहीजण पॉझिटिव्ह आले, तर त्यांना मात्र परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची कोणतीही सुविधा करण्यात येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
१४ मार्च रोजी होणारी एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता २१ मार्च रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. औरंगाबादेत ५९ परीक्षा केंद्रांवर १९ हजार ६५६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. रविवारी सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत ही परीक्षा होणार आहे. रविवारी संपूर्ण दिवस लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना पाणी व जेवणाची व्यवस्था स्वत: करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रविवारी या परीक्षेसाठी केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, समन्वयक, पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक, समावेशक, भरारी पथक, लिपिक, वाहनचालक, बेलमन, स्वच्छता कर्मचारी, केअर टेकर, सहायक कर्मचारी आदी १६५० कर्मचारी- अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तथापि, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रशिक्षणादरम्यान, केंद्रप्रमुखांसह परीक्षा केंद्रांवर तैनात कर्मचाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ तपासणी सक्तीची केली आहे. जिल्हा प्रशासनाची ही सूचना आजपर्यंत कोणीही गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत केंद्राध्यक्षांना तीनेवळा स्मरणपत्र दिले असून केंद्रांवरील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या तपासणीची जबाबदारी आता केंद्राध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे.
चौकट.....
केंद्रांवर ‘पीपीई किट’ची सुविधा
या परीक्षेसाठी ५९ केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात येण्यापूर्वीच प्रवेशद्वारात विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी मोजली जणार आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतची थोडीशी जरी लक्षणे आढळून आली, तर अशा संशयित विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. गंभीर लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीपीई किट’ घालून परीक्षा देण्याचीदेखिल व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक केंद्रांवर ‘पीपीई किट’ ठेवले जाणार आहेत.