ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, त्यांना देशात बदल घडवायचाय: संजय सिरसाट
By बापू सोळुंके | Published: January 22, 2024 07:54 PM2024-01-22T19:54:57+5:302024-01-22T19:55:36+5:30
रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार असल्याची टीकाही आमदार सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली
छत्रपती संभाजीनगर: ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, ते देशाची सत्ता बदलायला निघाल्याची खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ता आ. संजय सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर येथे पत्रकारांशी बोलताना केली. राम मंदीराचा निवडणूकीत आम्हाला फायदा होत असेल तर तुमच्या पोटात का दुखतं, जो काम करतोय, त्यांनी फायदा घेतल्यास गैर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आ. सिरसाट म्हणाले की, आज अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे देशभरात आनंदोत्सव होत आहे. आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यासह सर्वजण येत्या काही दिवसांत अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहाेत. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहे. फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहे. तिकडे आरती चालली म्हणून हे नाशिक मध्ये आरती करत आहेत. स्वतःला विद्ववान समजणारे आता प्रभू रामावर प्रश्न विचारत आहेत. रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार असल्याची टीकाही सिरसाट यांनी पक्षप्रमुख ठाकरेंवर केला. स्वर्गीय बाळासाहेबांची मंदिराबद्दल भूमिका आणि योगदान नाकारता येणार नाही. पण यांना वाटतं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं ,पण आम्ही यांना का महत्व द्यायचं? हा इव्हेंट नाही, तर आनंदोत्सव असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
संजय राऊत आता गांधी अन् पवार यांचेही प्रवक्ते
घरातली माणसं यांनी ठेवली नाही, मुंबईत पाणी शिरलं तेव्हा बाळासाहेबांना एकटं सोडून पळाले, हे दलाल आहेत. यांनी साहेबांना विकायला पण कमी केलं नसतं. खा. संजय राऊत हे सतत शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर लक्ष ठेवून असतात. आता ते उबाठा पक्षासोबतच गांधी आणि पवार यांचेही प्रवक्ते बनल्याची टीका त्यांनी केली. देशात बदल करण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी घर सांभाळावे, यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही.
टिकणाऱ्या आरक्षणास वेळ लागतो
मनोज जरांगे हे लाखो जनतेसह मुंबईला निघाले या आंदोलनाकडे सरकार का दुर्लक्ष करते, या प्रश्नाचे उत्तर देताना आ. सिरसाट म्हणाले, जरांगे यांना जनतेचा पाठिंबा आहे. पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांनी आरक्षण देऊ असे सांगितले आहे. त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. जरांगे यांच्यासोबत लहान मुले, वृद्ध आहेत, त्यांची काळजी घ्यावी असे आमचे आवाहन आहे. आज आरक्षण दिलं तर लोक न्यायालयात जातील म्हणून आम्ही कायदेशीर आणि टीकणारे आरक्षण देणार आहे, त्यामुळे वेळ लागत असल्याचे सिरसाट म्हणाले.