ज्यांनी पैसा हडपला त्यांची झोप उडविणार; मलकापूर बँकेचे ठेवीदार आता रडणार नाही लढणार
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 15, 2023 06:56 PM2023-12-15T18:56:52+5:302023-12-15T18:57:18+5:30
बँकेवर निर्बंध येऊन दोन वर्ष झाले. आतापर्यंत रक्कम मिळण्यासाठी विनवण्या केल्या, खूप रडलो, डोळ्यातील पाणी आटले आता रडणार नाही. तर लढणार
छत्रपती संभाजीनगर : कोणी निवृत्तीची मिळालेली रक्कम बँकेत ठेवली होती. तर कोणी व्यवसायातील रक्कम ठेवली होती. कोणी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी तर कोणी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवी ठेवल्या होत्या...आरबीआयने मलकापूर अर्बन को-ऑप. बँकेची परवानगी रद्द केली आणि सर्व ठेवीदारांना मोठा धक्का बसला... काही काळ त्यांच्या डोळ्यासमोर अंधार निर्माण झाला. बँकेवर निर्बंध येऊन दोन वर्ष झाले. आतापर्यंत रक्कम मिळण्यासाठी आम्ही विनवण्या केल्या, खूप रडलो, डोळ्यातील पाणी आटले आता रडणार नाही. लढणार ज्यांनी आमची रक्कम हडपली त्यांनी झोप आता उडविणार...अशा शब्दात ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी निर्धार केला.
मलकापूर अर्बन कॉ-ऑप. बँक लिमिटेड ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीने उद्या शुक्रवारी दि. १५ डिसेंबरला गुलमंडी येथे बँकेसमोर सकाळी १०.३० वाजता धरणे आंदोलन करणार आहे. त्यानिमित्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठक गुरुवारी (दि.१४) घेण्यात आली. यापुढे मलकापुरात आंदोलन आणि त्यानंतर थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचा नियोजन करण्यात आले.
मलकापूर अर्बन कॉ-ऑप. बँक लि.
१) बँकेच्या कुठे शाखा : मलकापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मूर्तिजापूर.
२) किती शाखा : २८ शाखा.
३) एकूण कितीच्या ठेवी : सुमारे एक हजार कोटीच्या ठेवी.
४) छत्रपती संभाजीनगरात किती शाखा : गुलमंडी, मायानगर, सिडको एन-२, बीड-बायपास, रेल्वेस्टेशनरोड, पुंडलिकनगररोड आणि टीव्ही सेंटर अशा सात शाखा.
५) खाती किती : ४० हजार खाती.
६) १७५ नागरी सहकारी पतसंस्थेचे खाते व ३०० कोटींची ठेवी अडकून पडल्या.
आरबीआयने का रद्द केली परवानगी
१) चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केले ते वसूल न झाल्याने बँक डबघाईला
२) ऑगस्ट २०२१ मध्ये ग्राहकांच्या केवायसी नॉर्म्समध्ये गडबड आढळल्याने बँकेला दोन लाखांचा दंड लावला.
३) आरबीआयने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी बँकेवर निर्बंध आणले.
४) ५ जुलै २०२३ रोजी बँकेचा परवाना रद्द केला.
बँकेच्या वतीने ११ सप्टेंबरला दिली अधिकृत आकडेवारी
१) आजघडीला बँकेकडे ६६९ कोटी ५९ लाख रुपयांची ठेवी.
२) त्यात १२० पतसंस्थांच्या २१७ कोटींच्या ठेवी आहेत.
३) उर्वरित ४५२ कोटी ५९ लाखांच्या ठेवी सामान्य ठेवीदारांच्या आहेत.
फॉरेन्सिक ऑडिटची कॉपी द्या
या आधी बँकेचे ऑडिट झाले त्यावर आमचा विश्वास नाही. फॉरेन्सिक ऑडिटचा कॉपी आम्हाला द्या. त्यातून कोणाला कर्ज दिले किती कर्ज दिले आणि किती जणांनी कर्ज थकवून बँकेला बुडविले हे कळेल.
-शिवनाथ राठी, अध्यक्ष, ठेवीदार संघर्ष कृती समिती
निवृत्तीच्या वयात करावे लागते काम
मी व्यावसायिक आहे. उमेदीच्या काळात जेवढी रक्कम कमविली ती वृद्धापकाळात कामाला येईल. यासाठी ती रक्कम मलकापूर अर्बन बँकेत ठेवली होती. बँकेच्या संचालकांनी घात केला. आता निवृत्तीच्या वयात पुन्हा व्यवसाय सुरू करावा लागला.
-मधुसूधन बजाज, ठेवीदार
आमच्या ठेवी परत पाहिजे
बँकेचे संचालक मंडळ म्हणतात आता परवाना रद्द केला. तुम्हाला तुमच्या ठेवीची रक्कम पाहिजे असेल तर आरबीआयला विनंती करा. आरबीआयचा आमचा संबंध नाही. आम्ही बँकेत ठेवी ठेवल्या. अध्यक्ष, संचालकांची संपत्ती विकून आम्हाला आमच्या ठेवी परत करा.
-पंकज साखला, ठेवीदार
कर्ज बुडव्यांची यादी जाहीर करा
ज्या लोकांनी लाखो, कोट्यवधीचे कर्ज बुडविले, त्यांची यादी जाहीर करण्यात यावी. कोणाला कर्ज दिले ते कोण आहेत, त्यांची पत काय आहे हे समोर येईल.
-निखिल मित्तल, ठेवीदार
दोन वर्षे झाले पैसे अडकून...त्या साठी आता लढणार
दोन वर्षे झाले बँकेत जनतेचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहे. आता एकही ठेवीदार रडणार नाही. बस्स आता हक्काच्या रकमेसाठी लढाईला आम्ही सज्ज झालो आहोत. त्याची सुरुवात शुक्रवारपासून करत आहोत.
-सचिन झवेरी, उपाध्यक्ष, ठेवीदार संघर्ष कृती समिती