साठी ओलांडलेल्या त्या ‘तरुणांचा’ सायकल प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 04:28 PM2018-09-21T16:28:16+5:302018-09-21T16:31:43+5:30
व्यायामाच्या अभावामुळे गुडघेदुखी, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधी आजकाल वयाची अगदी तिशी ओलांडताच जडत आहेत.
औरंगाबाद : व्यायामाच्या अभावामुळे गुडघेदुखी, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधी आजकाल वयाची अगदी तिशी ओलांडताच जडत आहेत. या आजारांमुळे पन्नाशीनंतर अनेकांना बस किंवा कारने प्रवास करणेही जिवावर येते. अशा परिस्थितीत वयाची साठी ओलांडलेले काही तरुण (!) पुणे ते लोणार असा प्रवास चक्क सायकलवर करीत असून, त्यांचा हा प्रवास प्रत्येकालाच अचंबित करणारा ठरत आहे.
गाड्यांचा सुळसुळाट झालेला असताना सायकल जणू अडगळीतच पडल्यासारखी झाली आहे. एखादा किलोमीटर सायकल चालविल्यामुळे धाप लागणारे अनेक तरुण पाहायला मिळतात. अशा सर्वांसाठीच पुण्याहून सायकलिंग करीत निघालेल्या या सर्व ज्येष्ठांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
दि.१८ रोजी पुणे येथून तेरा जणांनी हा सायकल प्रवास सुरू केला. यापैकी दोन जण वगळता उर्वरित सगळी मंडळी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत. ग्रुपमधील सर्वात ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय मेहेंदळे ७७ वर्षांचे आहेत. मंगळवारी त्यांनी पुणे ते नगर हा टप्पा पार केला. दि. १९ रोजी ते नगरहून औरंगाबादला पोहोचले. दि.२० रोजी त्यांनी औरंगाबाद ते लोणार असा मार्ग पूर्ण केला.
या प्रवासाविषयी संजय कट्टी म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात बैठे काम वाढल्यामुळे शरीराला व्यायाम, मेहनतीची सवय राहिलेली नाही. आम्ही सर्व जण आमच्या आनंदासाठी हा प्रवास करीत असून, सायकलिंगचे महत्त्व कृतीतून दाखवित आहोत. अविनाश मेढेकर, पद्माकर आगाशे, अनिल पिंपळीकर, डॉ. सुभाष कोकणे, दत्तात्रय गोखले, केशव जहागीरदार, दत्तात्रय मेहेंदळे, अरविंद चितळे, तान्हाजी सावंत, भारत केतकर, संजय कट्टी, प्रदीप भवलकर, विनायक मेढेकर यांचा या ग्रुपमध्ये सहभाग आहे.
लवकरच करणार पुणे ते कच्छ प्रवास...
अविनाश मेढेकर आणि दत्तात्रय गोखले यांनी दहा वर्षांपूर्वी आवड म्हणून पुण्यात सायकलिंग सुरू केले. त्यानंतर एके क जण यामध्ये जोडले गेले. आज त्यांच्या या ग्रुपमध्ये ६० ते ७० जणांचा सहभाग असून, आजवर त्यांनी पुणे- कन्याकुमारी, कोल्हापूर- मंगलोर, पुणे- गोवा असा प्रवास सायकलवर केला आहे. लवकरच पुणे- कच्छ असा प्रवास करण्याचाही त्यांना मानस आहे. ही मंडळी दररोज सकाळी २५ ते ३० किमी सायकलिंग करतात.