...तरी ‘कदाचित अजूनही’ बदल होऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:33 AM2019-12-19T05:33:25+5:302019-12-19T12:01:08+5:30

अनुराधा पाटील : साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केले मनोगत

... though 'maybe still' may change : Anuradha patil | ...तरी ‘कदाचित अजूनही’ बदल होऊ शकतो

...तरी ‘कदाचित अजूनही’ बदल होऊ शकतो

googlenewsNext

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : सगळेच निराशाजनक असले तरी नव्या आशा पल्लवित होऊ शकतात आणि ‘कदाचित अजूनही’ अपेक्षित बदल होऊ शकतो, असे मनोगत कवयित्री अनुराधा पाटील यांनी व्यक्त केले.‘कदाचित अजूनही’ कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनुराधा पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

‘हजारो वर्षांपासून आपण मागतो आहोत, सुईच्या अग्रावर मावेल एवढी तरी भूमी पाय टेकवण्यापुरती, पण हरणाऱ्यांच्या बाबतीत तर इतिहासही निर्दय असतो कायम, म्हणून मी कविता लिहिते, तेव्हा कृतीच करीत असते, माणूसपणाच्या अधिकाधिक जवळ जाण्याची...’ ही कविता वाचून दाखवीत त्यांनी चर्चेला सुरुवात केली.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सगळ्यात पहिली भावना काय होती?
सगळ्यात पहिल्यांदा खरेतर नवल वाटले; पण राष्ट्रीय स्वरूपाचा पुरस्कार मिळाल्याचा आत्मिक आनंद आहे. खरे तर तरुण वयात तुमच्या भावना अधिक उत्कट असतात. तुम्हाला खेचून नेणाºया असतात; पण आता ज्या वयात मला पुरस्कार मिळाला आहे, त्याचा मी अत्यंत शांतपणे आणि खूप संथपणे स्वीकार करते. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही. ज्यांचा राहून गेला, अशा सगळ्यांचाच तो गौरव आहे, असे मी मानते.

‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाबाबत काय सांगाल?
हा माझा पाचवा कवितासंग्रह आहे. एकंदरीतच एक कवयित्री म्हणून माझ्यात जे बदल होत गेले, त्या सर्व बदलत्या जाणिवांना मांडणारा हा काव्यसंग्रह आहे. या संग्रहात स्त्रियांसंदर्भातील विविध प्रश्न आणि मानवी जगण्याबाबतचे प्रश्न मांडले आहेत. खरे तर स्त्रीवाद हा आता बदनामीचा शब्द झाला आहे. काही जणांना तो नकारात्मक वाटतो. मी स्त्रीवादी नाही; पण तरीही स्त्रियांच्या बाजूने काही कविता मांडल्या आहेत. ज्यांना काही चेहरा नाही, अशांवरही या काव्यसंग्रहातून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनच ‘कदाचित अजूनही’मधील काही कविता स्फुरलेल्या आहेत.

साहित्य प्रवासात पती कौतिकराव ठाले पाटील यांची कशी साथ मिळत गेली?
माझी कविता पुढे जाण्याचे सगळे श्रेय माझ्या पतीलाच आहे. माझी कविता उभी राहिली तीच मुळात कौतिकराव ठाले पाटील यांच्यामुळे. भारतीय स्त्री म्हणून नवºयाला यशाचे श्रेय देत आहे, असे मुळीच नाही. नवी जोडपी ज्याप्रमाणे एकमेकांना स्पेस देतात, तसेच नाते आम्ही कित्येक वर्षांपासून जपले आहे. माझ्या कवितेवर काम करणे, पत्रव्यवहार बघणे ही सर्व कामे तेच करतात.

Web Title: ... though 'maybe still' may change : Anuradha patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.