सतीश चव्हाणांनी मोर्चेबांधणी केली, तरी यावेळी निवडणूक रंगणार हे अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 04:54 PM2020-11-03T16:54:04+5:302020-11-03T17:00:15+5:30
१९५३ पासून ते १९७८ पर्यंत हा मतदारसंघ पुणे-खान्देश-मराठवाडा असा संयुक्त होता आणि ७८ पर्यंत त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील प्रतिनिधित्व करत होते.
- सुधीर महाजन
मोदी लाटेतही २०१४ मध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण निवडून आले हा तर एका अर्थाने भाजपला धक्काच होता; परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोपीनाथ मुंडेंचे निधन झाल्याचा फटकाही भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकरांच्या पराभवाचे एक कारण होते. १९५३ ते २०२० अशा ६७ वर्षांच्या इतिहासात बहुतेक काळ या मतदारसंघावर भाजपचे प्रभुत्व राहिले. आता गेल्या दोन निवडणुकींतील पराभवाचा वचपा काढण्याची तयारी भाजपने केली; पण आज निवडणुका जाहीर होईपर्यंत उमेदवाराची अधिकृत घोषणा नाही आणि रोज नवीन एक नाव पुढे येत आहे. सतीश चव्हाणांनी मोर्चेबांधणी केली, तरी यावेळी निवडणूक रंगणार हे अटळ आहे.
१९५३ पासून ते १९७८ पर्यंत हा मतदारसंघ पुणे-खान्देश-मराठवाडा असा संयुक्त होता आणि ७८ पर्यंत त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील प्रतिनिधित्व करत होते. ७८ साली सर्व मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यात विधान परिषदेचाही समावेश असल्याने मराठवाड्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळाला आणि भाजपच्या कुमुदताई रांगणेकर या निवडून आल्या. आजच्या घडीला या मतदारसंघात ३ लाख ५२ हजार मतदार असून, १२ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी चालणार आहे. शक्तिस्थळांचा विचार केला तर सतीश चव्हाण गेल्या १२ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. शिवाय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या मराठवाड्यातील आघाडीच्या शिक्षण संस्थेचे ते सरचिटणीस आहेत. ही शिक्षण संस्था महत्त्वाची यासाठी की, येथील सर्व पदाधिकारी आणि संचालक हे मराठवाड्याच्या राजकारणातील प्रभावी समजले जातात. हे संचालक एकजुटीने चव्हाणांच्या मागे उभे राहिले तर ती त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. गेल्या बारा वर्षांत चव्हाणांनी शिक्षक, प्राध्यापकांचे एक जाळे विणले आणि आपल्या समर्थकांचा एक गट उभा केला.
भाजपच्या दृष्टीने मतदारांच्या विचारांमध्ये गेल्या दहा वर्षांत झालेला बदल आणि वाढलेले भाजपचे समर्थन ही जमेची बाजू समजता येईल. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात जेवढ्या शिक्षण संस्था आहेत. त्यांची बरोबरी भाजपला करता येणार नाही; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत कार्यरत असणारी प्रचार यंत्रणा प्रभावी आहे. याशिवाय मराठवाड्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली आहे. गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील पदवीधरांचे तसेच शिक्षक आणि प्राध्यापकांचे प्रश्न अतिशय तीव्र बनले असले, तरी त्यावर तोडगा निघाला नाही. शाळांचे अनुदान, कंत्राटी शिक्षक, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक हे प्रश्न गंभीर आहेत. हॉटेलमध्ये काम करणारे तासिका तत्त्वावरील विनावेतनावर काम करणारे शिक्षक, मराठवाड्यात तयार झालेली बेरोजगारांची फौज असे ज्वलंत प्रश्न आज यावेळी उभे राहिले आणि मतदारही जागरूक बनला आहे.
कोरोनामुळे रेंगाळलेल्या या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे.https://t.co/ilTfLDUM1o
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) November 3, 2020
मराठवाडा पदवीधर निवडणूक दृष्टिक्षेप
उमेदवार पक्ष वर्ष
उत्तमराव पाटील जनसंघ— १९५३ ते ७८
कुमुद रांगणेकर जनसंघ- १९७८
वसंतराव काळे काँग्रेस एस - १९८४
सुरेश हिरे (पराभूत, भाजप)
जयसिंग गायकवाड भाजप १९९०
वसंतराव काळे (पराभूत, काँग्रेस)
जयसिंग गायकवाड भाजप १९९६
वसंतराव काळे (पराभूत, काँग्रेस)
वसंतराव काळे (पोटनिवडणूक) काँग्रेस १९९८
संजय निंबाळकर (पराभूत, भाजप)
श्रीकांत जोशी भाजप २००२
वसंतराव काळे (पराभूत, काँग्रेस)
सतीश चव्हाण राष्ट्रवादी २००८
श्रीकांत जोशी (पराभूत, भाजप)
सतीष चव्हाण राष्ट्रवादी २०१४
शिरीष बोराळकर (पराभूत, भाजप).