औरंगाबाद-पैठण रस्त्याचे काम पूर्ण झाले तरी वाळूज लिंक रोड अजूनही बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 12:29 PM2017-12-20T12:29:06+5:302017-12-20T12:33:52+5:30
औरंगाबाद- पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने लिंक रोड मार्गावरील वाहतूक ७ महिन्यापांसून बंद करण्यात आली होती. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण होऊनही लिंक रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात न आल्यामुळे वाहनधारकांना मोठा फेरा मारून ये-जा करावी लागत आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद- पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने लिंक रोड मार्गावरील वाहतूक ७ महिन्यापांसून बंद करण्यात आली होती. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण होऊनही लिंक रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात न आल्यामुळे वाहनधारकांना मोठा फेरा मारून ये-जा करावी लागत आहे.
पैठण रस्त्याचे काम चालू असताना लिंक रोडमार्गे पैठण व शहराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक शाखेशी तोंडी चर्चा केल्यानंतर हा रस्ता बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रेल्वेस्टेशनचे कांचनवाडीपर्यंत सिमेंटीकरणाचे काम आठवडाभरापूर्वी उरकले आहे. त्यामुळे लिंक रोड चौफुलीवरून होणारी वाहतूक सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदिल दाखविला होता. मात्र, वाहतूक शाखेकडून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे वाळूज औद्योगिकनगरी तसेच मुंबई-नाशिककडून येणार्या वाहनधारकांना नगर नाकामार्गे ये-जा करावी लागत आहे.
रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जात नसल्यामुळे भाजपचे प्रशांत नांदेडकर, उल्हास पाटील यांनी आज मंगळवारी लिंक रोड चौफुलीवर तैनात वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांना हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. मात्र, वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशाशिवाय हा रोड खुला केला जाणार नसल्याचे वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी या पदाधिका-यांना सांगितले. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कैलास गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील, असे सांगत अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.
टोल नाक्याचे कनेक्शन
लिंक रोड सात महिन्यांपासून बंद असल्यामुळे दररोज हजारो जड वाहनांना नगर नाकामार्गे ये-जा करावी लागत आहे. मालाची ने-आण करणार्या जड वाहनधारकांकडून गोलवाडी पथकर नाक्यावर टोल टॅक्सची वसुली करण्यात येते. गत सहा-सात महिन्यांत या टोल नाक्यावरील धंदा चांगलच वाढला आहे. लिंक रोड वाहतुकीसाठी खुला झाल्यास जड वाहनांची ये-जा बंद होईल. यामुळे पथकरचालक वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांना हाताशी धरून लिंक रोड वाहतुकीसाठी खुला करण्यास आडकाठी आणत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.