औट्रम घाटात बोगदा अन् रेल्वे मार्ग सोबत करण्याचा विचार; गडकरी-वैष्णव बैठकीत होणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:55 IST2025-04-08T18:53:59+5:302025-04-08T18:55:09+5:30
या बैठकीत घाटात बोगदा आणि रेल्वेमार्ग बांधण्याबाबत चर्चा होणार आहे.

औट्रम घाटात बोगदा अन् रेल्वे मार्ग सोबत करण्याचा विचार; गडकरी-वैष्णव बैठकीत होणार निर्णय
छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्गावरील कन्नड येथील औट्रम घाटात बोगदा बांधण्याप्रकरणी ८ एप्रिल रोजी दिल्लीत रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय दळणवळण खात्यांच्या मंत्र्यांमध्ये सायंकाळी ५ वा. महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत घाटात बोगदा आणि रेल्वेमार्ग बांधण्याबाबत चर्चा होणार आहे.
रेल्वे आणि एनएचएआय यांच्यातील चर्चेअंती या प्रकल्पाचा मार्ग मोकळा होतो की नाही, हे बैठकीनंतर स्पष्ट होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात संयुक्त बैठक होत आहे. यावेळी खा. डॉ. भागवत कराड यांच्यासह रेल्वे आणि एनएचएआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.
साधारणत: ७ हजार कोटींचा बोगद्याचा प्रकल्प आहे. त्यात रेल्वे आणि एनएचएआय यांच्या निम्मा-निम्मा खर्च करून हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत चर्चा होऊन निर्णय होणे शक्य आहे. असे झाल्यास चाळीसगावमार्गे बीड ते सोलापूर रेल्वेमार्ग होण्यास चालना मिळेल. बोगद्याचे काम होण्यास मंजुरी मिळाली तर उत्तर, मध्य व दक्षिण भारताला महामार्गाची कनेक्टिव्हिटी मिळणे सोयीस्कर होईल. दरम्यान, २०११ पासून बोगद्याचे काम होण्याबाबत चर्चा सुरू आहे. १४ वर्षांपासून यावर काहीही तोडगा निघालेला नाही. आता एनएचएचआयने बोगद्याला पर्यायासह अलायन्मेंट तयार करून मंजुरीसाठी मुख्यालयाकडे पाठविले असतानाच रेल्वे मार्गासह बोगदा करण्याचा नवीन प्रस्ताव समोर आला आहे.