औरंगाबादेत एसटी महामंडळातील चालक-वाहक पदासाठी हजारो अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 05:09 PM2019-02-20T17:09:41+5:302019-02-20T17:13:34+5:30
भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी महामंडळातर्फे उमेदवारांना ई-मेल करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : एस.टी. महामंडळाने भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात चालक-वाहक पदासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. हजारो बेरोजगार उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज दाखल केले. राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी राबविण्यात येत असलेली ही भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत आहे. भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी महामंडळातर्फे उमेदवारांना ई-मेल करण्यात येणार आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी ४ हजार २४२ पदांची भरती करण्यात येत आहे. भरती औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे या पंधरा जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. ११ जिल्ह्यांत ४ हजार २४२ पदांच्या जागा आहेत. बीड,लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांत चालक तथा वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत.
दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांना काम देण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करून रिक्त जागांवर इतर जिल्ह्यांत नियुक्ती देण्यात येईल. एकाच दिवशी चालक तथा वाहक पदाच्या परीक्षा संबंधित जिल्ह्यात घेतल्या जातील. या भरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही एस.टी महामंडळाने घेतला आहे.
अर्ज भरण्यासाठी तारेवरची कसरत
एस.टी. महामंडळाने आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते. इच्छुक उमेदवारांनी विविध कागदपत्रे अपलोड करणे, बँकेचा धनादेश लावणे आदी कामे आॅनलाईन पद्धतीने केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. औरंगाबाद जिल्ह्यातील २४० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पात घेणार
मराठा आरक्षणाचे निकष भरतीसाठी लावण्यात आले आहेत. आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना एस.टी.महामंडळात सामावून घेता आले नाही, तर औरंगाबाद शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील बस सेवेत १५ हजार रुपयांच्या कंत्राटी पद्धतीवर घेण्यात येणार आहे.
शुल्कात सवलत
दुष्काळग्रस्त भागातील अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली. उमेदवारांची नंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज किती आले याचा आकडा मुंबई कार्यालयाला माहीत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.