सद्भावना राखण्यासाठी एकजुटीने धावले हजारो औरंगाबादकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:39 PM2019-07-27T23:39:23+5:302019-07-27T23:39:41+5:30
‘सामाजिक सलोखा’, ‘पाणी वाचवा, झाडी जगवा’, ‘बेटी बचाव, बेटी पढ़ाव’चा संदेश देत आणि सामाजिक सद्भावना राखण्यासाठी आयोजित ‘रन फॉर औरंगाबाद’ या उपक्रमात सहभागी होत हजारो औरंगाबादकर एकजुटीने धावले.
औरंगाबाद : ‘सामाजिक सलोखा’, ‘पाणी वाचवा, झाडी जगवा’, ‘बेटी बचाव, बेटी पढ़ाव’चा संदेश देत आणि सामाजिक सद्भावना राखण्यासाठी आयोजित ‘रन फॉर औरंगाबाद’ या उपक्रमात सहभागी होत हजारो औरंगाबादकर एकजुटीने धावले.
शहर पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा परिषदेतर्फे शनिवारी रात्री ७.३० वाजता ‘रन फॉर औरंगाबाद’ हा ५ किलोमीटर धावण्याचा उपक्रम घेण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंदर सिंगल, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, लोकमत महामॅरेथॉनच्या संचालिका रुचिरा दर्डा, एमजीएमचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी ध्वज दाखवून ‘रन फॉर औरंगाबाद’चा शुभारंभ केला. तत्पूर्वी, रिलॅक्स झीलच्या वतीने दहा मिनिटे वॉर्मअप करण्यात आले. त्यानंतर ही दौड क्रांतीचौकातून रेल्वेस्टेशन रस्त्यावरील एमटीडीसी कार्यालयापर्यंत गेली. तेथून वळण घेऊन परत क्रांतीचौकात या दौडची सांगता करण्यात आली. शहरात शांतता नांदावी याकरिता आयोजित या स्तुत्य उपक्रमात रुचिरा दर्डा यांच्यासह लोकमत महामॅरेथॉनची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. या उपक्रमाचे स्वागत करीत असे आणखी उपक्रम शहरात होतील, अशी आशा टीम मेम्बर्सनी व्यक्त केली.
या दौडमध्ये सुमारे साडेतीन ते चार हजार औरंगाबादकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. यात शहरातील उर्दू, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या विविध शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी गणवेशात सहभागी झाल्या. भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेतील तरुण, तरुणींचा सहभाग लक्षणीय होता.
यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी सामाजिक सलोखा, पाणी बचत, बेटी बचाव, बेटी पढ़ाओ हा संकल्प आज करूया, असे आवाहन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक सिंगल आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना शहरात सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले, तसेच यापुढे शहरात शांतता नांदेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिव स्वराज्य प्रतिष्ठानच्या
ढोल पथकाने आणली रंगत
‘रन फॉर औरंगाबाद’ सुरू होण्यापूर्वी शिव स्वराज्य प्रतिष्ठानच्या ढोल पथकाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. या ढोल पथकाने उत्तम आणि शिस्तबद्ध सादरीकरण करून धावपटूंचा उत्साह वाढविला.
.८५ वर्षीय चौहान यांचा सहभाग
या स्तुत्य उपक्रमात ८५ वर्षीय सुरेंद्र चौहान हे त्यांची व्हिंटेज कार घेऊन आले होते. त्यांचा उत्साह पाहून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्टेजवर बोलावून त्यांना मनोगत व्यक्त करायला लावले. यावेळी चौहान यांनी हम सब एक है, असे म्हटले आणि हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांना साद दिली.
यांची झाली मदत
हेल्प रायडर्सचे संदीप कुलकर्णी, राजाभाऊ जाधवर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. सोमाणी, मुकुंद भोगले, प्रकाश बोर्डे, रिलॅक्स झिलचे संजय पाटील, शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे सुमित पवार, रोशन जैसवानी.
वाहतूक शाखेचा बंदोबस्त
‘रन फॉर औरंगाबाद’ या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त एच. एस.भापकर, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक उत्तम मुळक, वाहतूक शाखेच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी पुढाकार घेतला. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, उपनिरीक्षक सरला गाडेकर आणि कर्मचाऱ्यांनी क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ दिली नाही.
दोन मुलींना आली चक्कर
दौडमध्ये गरुडझेप अकादमीच्या दोन मुलींना चक्कर आल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एनर्जी ड्रिंक आणि पाण्याची सुविधा
‘रन फॉर औरंगाबाद’च्या मार्गावर अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती. धावपटू या एनर्जी ड्रिंक आणि पाण्याचा लाभ घेत होते.