जात पंचायतीने कुटुंबाला टाकले वाळीत
By Admin | Published: October 7, 2016 12:46 AM2016-10-07T00:46:33+5:302016-10-07T01:31:17+5:30
औरंगाबाद : जातीपातीच्या बेड्या आजही प्रचंड मजबूत आहेत. मागास आणि आदिवासी समाजातील कौटुंबिक वादावरही जात पंचायतीकडूनच निर्णय केला जातो
औरंगाबाद : जातीपातीच्या बेड्या आजही प्रचंड मजबूत आहेत. मागास आणि आदिवासी समाजातील कौटुंबिक वादावरही जात पंचायतीकडूनच निर्णय केला जातो. अशाच एका घटनेत जडीबुटी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चित्तोडिया लोहार समाजातील एका कुटुंबाला तब्बल तीन वर्षांपासून जातीबाहेर टाकण्यात आले आहे. कुटुंबातील एका सदस्यावर त्याच्याच सासऱ्याने परस्त्रीसोबत संबंध असल्याचा आरोप ठेवल्याने या कुटुंबाला तीन वर्षांपासून त्यांच्याच समाजात स्थान नाही. परिणामी या कुटुंबात कोणीही मुलगी देण्यास तयार नसल्याने दोन तरुणांचे विवाह होऊ शकले नाही.
याविषयी अधिक माहिती अशी की, देवळाई परिसरातील विनायक पार्कजवळ राणसिंग तेजसिंग चित्तोडिया (३५) हे पत्नी ताराबाई, भाऊ तारासिंग, रामसिंग आणि आई-वडील यांच्यासह राहतात. हे कुटुंब जडीबुडी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आॅगस्ट-२०१३ मध्ये राणासिंग यांना त्यांचे सासरे रतनसिंग ठाकूर (रा. हिंजेवाडी, दत्तवाडी, पुणे) यांनी फोन करून तू एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले आहे. त्यामुळे तुम्हा सर्व कुटुंबांना जातीबाहेर काढून टाकले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली. राणासिंग यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळत ‘त्या महिलेचे नाव सांगा’ असे आव्हान देऊन ते खरे निघाल्यास कोणतीही शिक्षा भोगायला तयार असल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर रतनसिंग ठाकूर हे रवींद्रसिंग ठाकूर, देवीसिंग चित्तोडिया, कृष्णासिंग चित्तोडिया आणि नवलसिंग चित्तोडिया हे औरंगाबादेत आले. यावेळी त्यांनी पुन्हा राणासिंग यांच्यावर परस्त्रीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. त्यांनी तुमच्या कुटुंबाला जातीबाहेर काढण्यात आल्याचे पुन्हा सांगितले. पुन्हा जातीत यायचे असेल तर गंगापरीक्षा (शुद्धीकरण) द्यावी लागेल, असे सांगितले.
पाच जणांविरोधात गुन्हा
राणासिंग यांनी २९ सप्टेंबर रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी आरोपी रतनसिंग ठाकूर, रवींद्रसिंग ठाकूर, देवीसिंग चित्तोडिया, कृष्णासिंग चित्तोडिया व नवलसिंग चित्तोडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.