राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मराठवाड्यात हजारो कोटींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 05:14 PM2020-02-01T17:14:25+5:302020-02-01T17:17:32+5:30
आता सोमवारीच उघडणार बँका
औरंगाबाद : युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली नऊ संघटनांनी एकत्र येऊन पगार वाढ व इतर मागण्यांसाठी दोन दिवस बँक बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड या जिल्ह्यातील बँकांचे शटर शुक्रवारी डाऊन होते. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून अनेक नागरिकांना आर्थिक व्यवहार करता आले नाही.
औरंगाबादमध्ये २१ राष्ट्रीयीकृत बँकांचे अडीच ते तीन हजार कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. यामुळे शुक्रवारी संपाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील बँकांच्या १५० शाखा बंद होत्या. परिणामी, दिवसभरातील जवळपास ६ हजार कोटींचे व्यवहार ठप्प राहिल्याचा दावा युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. औंरंगाबाद शहरात बँकींग कर्मचारी युनियनचे पदाधिकारी सुनील शिंदे, जगदीश भावठाणकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
जालना येथे संपाच्या पहिल्या दिवशी शिवाजी पुतळा भागातील एसबीआय बँकेसमोर कर्मचारी संघटनेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या संपामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास ३०० कोटींची दररोजची उलाढाल ठप्प झाली होती.
परभणी शहरासह जिल्ह्यातील सर्व आर्थिक व्यवहार संपामुळे ठप्प झाले होते. सकाळी येथील एसबीआयच्या शाखेसमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली़ त्यानंतर रॅली काढून जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांना निवेदन दिले़
बीड जिल्ह्यात संपाच्या पहिल्या दिवशी १५ राष्टीयकृत बॅँकेतील कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी बीड एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर तसेच परळी व अन्य ठिकाणी निदर्शने करुन प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संपामुळे तातडीच्या व्यवहारासाठी ग्राहकांनी पे अॅप, नेट बँकिंगचा वापर केला. जिल्ह्यात दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. संपात जिल्ह्यातील ९०० कर्मचारी सहभागी झाले होते.
हिंगोली जिल्ह्यातील सुमारे १५ ते २0 बँक शाखातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. यानिमित्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदनही दिले.
उस्मानाबाद जिल्ह्यात संपामुळे दिवसभर बँकांचे व्यवहार ठप्प होते. सकाळी ११ ते १२़३० या वेळेत एसबीआयच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी कर्मचाऱ्यांनी केंद्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास ४०० कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदविला़ लातूर शहरातील बँक आॅफ महाराष्ट्राच्या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले़ यावेळी केंद्र शासनाच्या धोरणावर टीका करीत आंदोलनकर्त्यांनी निषेधही केला़
नांदेडमध्ये १६०० कर्मचारी संपात सहभागी
नांदेडमध्ये जवळपास १६०० कर्मचारी, अधिकारी संपात सहभागी झाले आहेत़ त्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत़ ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी दोन दिवस हा संप राहणार आहे़ नांदेड जिल्ह्यातील एसबीआय, एसबीएचसह विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या १८० शाखा असून त्यामध्ये १६०० कर्मचारी कार्यरत आहेत़ शुक्रवारी पुकारलेल्या संपामध्ये सर्वच बँका आणि कर्मचारी सहभागी झाले होते़च्जिल्ह्यातील कोट्यवधींच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे़ शनिवारीदेखील बँका बंद राहणार आहे.रविवारी सुटी असल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे़