बालाजी रथोत्सवास हजारो भाविकांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:44 AM2017-10-01T00:44:04+5:302017-10-01T00:44:04+5:30
येथील श्री बालाजी संस्थानच्या रथोत्सवास शनिवारी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने शहर फुलले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : येथील श्री बालाजी संस्थानच्या रथोत्सवास शनिवारी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने शहर फुलले होते.
सकाळी १० च्या सुमारास श्री बालाजी मंदिरात गरूड खांबाभोवती छोट्या रथाने प्रदक्षिणा घातल्या. दुपारी तीन वाजता ५० फूट उंच रथामध्ये श्री बालाजीची मूर्ती ठेवण्यात आली. व्यंकटरमणा, गोविंदाच्या जयघोषात रथ ओढून परिक्रमेला सुरुवात झाली. श्री बालाजी मंदिर येथून दोरखंडाच्या सहाय्याने हा रथ ओढण्यास सुरुवात झाली. पानवेस, शनी मंदिर, डॉ.आंबेडकरनगर, दीलकश चौक, राजमोहल्ला, संत जनाबाई मंदिर, गोदाकाठ मार्गे परत बालाजी मंदिरापर्यंत रथ आणण्यात आला. रथ परिक्रमे दरम्यान, जागोजागी श्री बालाजीची आरती करण्यात आली. हजारो भाविकांनी रथावर बत्ताशे व फुलांची उधळण केली. सायंकाळी सात वाजता श्री बालाजीची मूर्ती अश्व वाहनात ठेऊन नगरपरिक्रमा केल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.