शेततळ्यात विष टाकल्याने हजारो माशांचा तडफडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:05 AM2021-09-18T04:05:02+5:302021-09-18T04:05:02+5:30
पाचोड : पैठण तालुक्यातील लिंबगाव येथे मच्छपालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेततळ्यात अज्ञात व्यक्तींनी विष टाकले. यामुळे दहा हजार माशांचा ...
पाचोड : पैठण तालुक्यातील लिंबगाव येथे मच्छपालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेततळ्यात अज्ञात व्यक्तींनी विष टाकले. यामुळे दहा हजार माशांचा तडफडून मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.
लिंबगाव येथील शेतकरी प्रभाकर गाढेकर यांच्याकडे दोन एकर शेती आहे. शेती कमी असल्याने मागील वर्षी त्यांनी आपल्या शेततळ्यात जोडधंदा म्हणून मत्स्यपालन सुरू केले. त्यासाठी त्यांनी ३० बाय ३० च्या शेततळ्यात शेततळ्यात दहा हजार मत्स्यबीज सोडले होते. आता हे मासे एक किलोच्या वजनाचे झालेले आहे. अजून तीन महिन्यांनी ते विक्रीसाठी उपलब्ध होणार होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी शेततळ्यात अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकले. यामुळे शुक्रवारी सकाळी गाढेकर यांना शेततळ्यातील मासे तडफडून मरताना दिसले. एका दिवसांतच दहा हजार मासे मृत झाले आहेत. या मच्छपालनासाठी गाढेकर यांनी आतापर्यंत चार ते पाच लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र अज्ञात माथेफिरूच्या कृत्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या घटनेने गाढेकर यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असून संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा करून त्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.