सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत; महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 07:00 PM2021-03-23T19:00:47+5:302021-03-23T19:02:44+5:30
सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे रविवारी मृत्यूमुखी पडले. सोमवारी महापालिका अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरोवराची पाहणी केली. मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठवले आहेत तर पाण्याच्या नमुन्यांची तपासणी स्वत: प्रदूषण नियंत्रण मंडळ करत आहे.
सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, असे असले तरी सलीम अली सरोवरातील पाणी वारंवार दूषित होत आहे. पाच-सात वर्षांपूर्वीदेखील सरोवरातील हजारो मासे मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर गतवर्षीही मासे मेल्याचा प्रकार घडला. रविवारी पुन्हा मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे बघायला मिळाले. पाण्यामध्ये माशांना जेवढा ऑक्सिजन मिळायला हवा, तेवढा मिळत नसल्याचे समोर आले आहे. मृत माशांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, सोमवारी सकाळीच महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी बी. एस. नाईकवाडे, उपअभियंता अशोक पद्मे, चांडक यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले की, मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठविण्यात आले आहेत. या तपासणीत माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट होईल. याचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पाण्याचे नमुने घेतले.
मृत मासे केले नष्ट
मासे कशामुळे मेले, याचा शोध घेतला जात असतानाच मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आले. या माशांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना करण्यात आल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.
पुन्हा जलपर्णीचा वेढा
सरोवरातील जलपर्णींमुळे जलचर प्राणी, विविध प्रकारच्या वनस्पती, वृक्षजाती, प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य धोक्यात आले होते. त्यामुळे येथील जलपर्णी नष्ट करण्याचे काम तत्कालिन महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या उद्यान विभागाने केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा जलपर्णींचा तलावाला वेढा पडत आहे.